खोपोली : पेण को-आॅप़ अर्बन बँकेतील ७५० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अनेक संचालक आणि रिझर्व्ह बँकेचे अधिकारी सामील आहेत. जर बँक लिक्विडेशनला काढली तर अनेक ठेवीदारांचे नुकसान होणार असून, ६०० कोटींच्या घोटाळ्याची रक्कमही पचली जाणार आहे. त्यामुळे पेण अर्बन बँकेच्या लिक्विडेशनला ठाम विरोध करण्याचा ठराव ठेवीदारांच्या सभेत करण्यात आला. पेण अर्बन बँक संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव, कोषाध्यक्ष हिमांशू कोठारी, सदस्य नरेंद्र साखरे, सी. के. पाटील इ. खोपोलीतील ठेवीदारांच्या सभेला उपस्थित होते. पेण अर्बन बँक लिक्विडेशनला काढली तर ९० टक्के ठेवीदारांचे पैसे मिळतील, असा दावा करण्यात येत आहे. मग घोटाळ्याच्या पैशातून जप्त केलेल्या जमिनी विकल्या अािण आता असलेले ४४ कोटी रुपये वाटले तर सर्वांचे सर्व पैसे मिळतील, असे जाधव यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यातील ४ बँका आतापर्यंत लिक्विडेशनमध्ये काढण्यात आल्या. काहींना ४-५ वर्षे घेऊन गेली तरी ठेवीदारांचे सर्व पैसे अद्याप मिळालेले नाहीत. पेण अर्बन ठेवीदारांच्या लढ्यामुळे प्रथमच आरबीआयचा अधिकारी गजाआड झाला. राज्य सरकार व आरबीआयने ठरवले तर ठेवीदारांचे सर्व पैसे काही दिवसांत मिळू शकतील. त्यासाठी बँक (अवसायनात) काढण्याची गरज नाही. (प्रतिनिधी)
पेण अर्बन ठेवीदारांचा लिक्विडेशनला विरोध
By admin | Updated: August 28, 2014 03:07 IST