बुलडाणा : पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे सध्या जिल्हाभरातील पेरण्या खोळंबल्या आहेत. काल काही तालुक्यात पावसाने हजेरी लावली असली तरी पेरणीयोग्य व सार्वत्रिक पाऊस नसल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. येत्या आठवडाभरात पावसाने चांगली हजेरी लावली तरच कापुस, सोयाबीन यासारख्या पिकांची पेरणी शक्य होईल अन्यथा मका पिकाशिवाय पर्याय राहणार नाही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा दिड महिना उलटून गेल्यावरही पाऊस नाही त्यामुळे पाऊस बरसला तरी, आता नेमके कोणते पीक घ्यायचे, हा प्रश्न शेतकर्यांसमोर आहे. उशिराने झालेल्या पेरणीचे उत्पादन समाधानकारक होत नाही. त्यामुळे पेरणी करायची की शेती पडिक ठेवायची अशा द्विधा मन:स्थितीत शेतकरी आहे. सोयाबीनची लागवड साधारणत: १५ जुलैपयर्ंत करायची असते मात्र पेरणीसाठी आवश्यक तसा पाऊस झाला नाही. कापूस आणि सोयाबीन पेरणीचा काळ संपल्यावर अल्पावधीत अधिक उत्पादन देणारे पीक नाही. त्यामुळे केवळ शेतीवर विसंबून असलेल्या शेतकर्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. कृषी विभागाच्या वतीने ३0 जुलै पर्यंत सोयाबीन पेरता येईल असे सांगण्यात येत असले तरी ती आपत्कालीन स्थिती आहे. लांबलेल्या पावसामुळे केवळ मका याच पिकावर समाधान मानावे लागेल. सद्या ठिबकवर तग धरून असलेल्या १८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरण्यांमध्ये १ हजार ३२४ हेक्टर तूर, ४९९ मुग, ४0८ उडीद व ६0 हेक्टर मका पिकाचे क्षेत्र आहे. दिवसेंदिवस खालावत चाललेली जलपातळी या पिकांनाही धोकादायक ठरत आहे.
** ८ टक्के पेरण्या
जिल्ह्यात ७ लाख ४१ हजार ३६९ हेक्टरपैकी फक्त ८ टक्के म्हणजे ६९ हजार ३0९ हेक्टरवर पेरण्या आटोपल्या. यामधील १८ हजार हेक्टर पेरण्या या ठिबकच्या भरवशावर असल्याने उर्वरित क्षेत्रातील पेरण्या धोक्यात आल्या आहेत. मोताळा, बुलडाणा व काही प्रमाणात देऊळगावराजा परिसरात केलेल्या धुळपेरण्या आता पुर्णपणे उलटल्या आहेत.
** पावसाची आशा पण
हुलकावणी दिलेल्या पावसाने काल हजेरी लावली. परंतु हा पाऊस तुरळक स्वरूपाचा असून सार्वत्रिक नव्हता. १४ जुलैच्या सकाळी ८ वाजता नोंदविलेल्या आकडेवारीनुसार जळगाव जामोद तालुक्यात सर्वाधिक ४८ मी.मी., बुलडाणा १९, मलकापूर १८, खामगाव ६.८0, संग्रामपूर ५, मोताळा ३ व मेहकर १ मी.मी. पाऊस पडला आहे. चिखली, देऊळगावराजा, शेगाव या तालुक्यात काल पाऊस नव्हता. पावसाने आशा निर्माण केली आहे. मात्र ढगाळ वातावरणाचे दमदार पावसात रूपांतर होत नसल्याने शेतकर्यांची चिंता वाढतीच आहे.
** केवळ ३४ टक्के पिककर्ज
बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांना १0५ कोटी कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यापैकी फक्त ३४ टक्के पिककर्जाचे वाटप झाले आहे. खरीप हंगामासाठी वाटप करण्यात आलेली पिककर्जाची रक्कम ६ कोटी २६ लाख एवढीच आहे. यामध्ये सर्वाधिक ६२ टक्के पिककर्ज हे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने केले आहे. बँक ऑफ इंडीया ५१ टक्के तर स्टेट बँक ऑफ इंडिया २५ टक्के कर्ज वाटप करू शकली आहे.