रत्नागिरी : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर वाढत चाललेल्या असहिष्णुतेच्या निषेधार्थ पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांवर टीका करत, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे म्हणाले, ‘या तिघांपैकी कोणाच्या चळवळीत साहित्यिकांनी काम केले आहे का, काम केले असेल तर नक्कीच आपल्याला पुरस्कार परत करण्याचा नैतिक अधिकार आहे. आजचा समाज जातिव्यवस्थेला प्राधान्य देणारा, भावुक आहे. समाज परिवर्तनासाठी साहित्यिकाचे योगदान आवश्यक आहे. त्यामुळे साहित्यिकाच्या डोक्यात हवा घालून न घेता, समाज परिवर्तनासाठी योगदान द्यावे.’कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) आणि कवी केशवसूत स्मारक मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून फुटाणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष खासदार विनायक राऊत, उद्घाटक अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, ऊर्मिला पवार, आमदार उदय सामंत, ‘कोमसाप’चे केंद्रीय अध्यक्ष महेश केळुस्कर, केंद्रीय कार्याध्यक्षा नमिता कीर, कार्यवाह प्रशांत परांजपे, जिल्हाध्यक्ष सुरेश खटावकर, अण्णा राजवाडकर, विश्वस्त अरुण नेरुरकर, भास्कर शेट्ये, गजानन पाटील उपस्थित होते.‘अभिनय क्षेत्रात काम करणारी मंडळी सामाजिक जाणिवेचे भान ठेवतात. आपण साहित्यिक आपल्या ३६५ दिवसांच्या व्यस्त जीवनातून बाहेर कधी येणार, आपण केवळ एखाद्या घटनेवर कविता लिहितो. त्या पलीकडे काहीच करत नाही. अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्यासारखी मंडळी दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करत असतील, तर साहित्यिकांनीही समाज परिवर्तनात प्रत्यक्ष सहभाग घेतलाच पाहिजे,’ अशा शब्दांत फुटाणे यांनी साहित्यिकांना फटकारले. (प्रतिनिधी)
... तरच पुरस्कार परत करण्याचा अधिकार!
By admin | Updated: October 19, 2015 03:01 IST