मुंबई : एसटीच्या हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मोफत प्रवास पासाचा प्रश्न अजूनही सुटलेला नसून या पासासंदर्भात निवृत्त कर्मचाऱ्यांबाबतची माहिती व्यवस्थापकीय संचालकांनी मागूनही वाहतूक विभागाने ती दिली नसल्याचे समोर आले आहे. एसटी महामंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षातून एकदा दोन महिन्यांकरिता कमी गर्दीच्या हंगामात मोफत प्रवासाचा पास दिला जात होता. त्यामुळे किमान ५00 रुपये भरून उर्वरित १० महिन्यांसाठी मोफत प्रवासाचा पास मिळावा, अशी मागणी एसटीच्या निवृत्त कर्मचारी संघटनेची होती. एसटीतील अन्य संघटनांकडूनही त्याला पाठिंबा दिला. याबाबत माजी परिवहनमंत्री मधुकरराव चौधरी यांनीही आॅगस्ट महिन्यात यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र याबाबत ठोस भूमिका घेतली गेली नाही. एसटी महामंडळाच्या १४ आॅगस्ट रोजी झालेल्या बैठकीत फेरप्रस्ताव सादर करण्यास एसटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी सांगितले. यावर २६ आॅगस्ट रोजी निर्णय घेण्यात येणार होता. मात्र खंदारे यांना वाहतूक विभागाकडून माहितीच उपलब्ध करण्यात न आल्याने त्यावर निर्णय झाला नाही. (प्रतिनिधी)
एसटीच्या निवृत्त कर्मचा-यांचा मोफत पासाचा प्रश्न रखडलेलाच
By admin | Updated: November 4, 2014 02:51 IST