‘सायबर क्राईम’ची आकडेवारी : एकचतुर्थांश गुन्हे ‘ई-छेडखानी’चे योगेश पांडे नागपूरहल्ली केवळ मोठ्या शहरांतच नव्हे तर अगदी ग्रामीण भागात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. युवापिढीसाठी तर इंटरनेट दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक आहे. परंतु ‘ई-क्रांती’सोबतच ‘सायबर क्राईम’च्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. बहुतांश प्रकरणे समोर येतच नसली तरी सरकारी आकडेवारीनुसार ‘आॅनलाईन’ माध्यमातून छेडखानी किंवा छळवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे बऱ्याच प्रकरणांत गुन्हेगार हे जवळील नातेवाईक किंवा परिचित व्यक्ती असल्याचे निदर्शनास आले आहे. जवळच्या नात्यांमध्ये अशाप्रकारे छळवणुकीचा ‘व्हायरस’ ही भविष्यातील एक मोठी समस्या बनण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.‘एनसीआरबी’ने (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो)२०१३ सालात झालेल्या ‘सायबर क्राईम’संदर्भातील आकडेवारी जारी केली आहे. संपूर्ण राज्यात २०१३ सालात ‘सायबर क्राईम’अंतर्गत ९०७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यापैकी जवळपास २६ टक्के म्हणजेच २३३ गुन्हे हे ‘आॅनलाईन’ छेडखानी किंवा छळवणुकीचे आहेत. राज्यात अशाप्रकारच्या गुन्ह्यांची टक्केवारी एकचतुर्थांश असली तरी, मुंबईत हे प्रमाण १७ टक्के इतकेच आहे. परंतु पुण्यात २७ तर नागपुरात ४० टक्के सायबर’ गुन्हे हे वरील प्रकारात मोडतात. ९०७ पैकी १७४ गुन्ह्यांत (१९ टक्के) गुन्हेगार हे नात्यातील, शेजारी राहणारे किंवा ओळखीतील व्यक्ती असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. उपराजधानीत ४० टक्के गुन्हे ‘ई’ छेडखानीचेदेशातील इतर मोठ्या शहरांप्रमाणे नागपुरात ‘सायबर क्राईम’ची प्रकरणे समोर यायला लागली आहेत. २०१३ सालात नागपुरात ‘सायबर क्राईम’अंतर्गत २३ गुन्हे दाखल करण्यात आले. यातील नऊ गुन्हे हे आर्थिक फसवणुकीचे असून, तेवढेच गुन्हे हे ‘आॅनलाईन’ छेडखानी किंवा छळवणुकीचे आहेत. २३ पैकी १८ प्रकरणांमध्ये गुन्हे करणारी व्यक्ती ही नात्यातील किंवा परिचयाचीच असल्याचे आढळून आले आहे. २३ प्रकरणांमध्ये केवळ दोन व्यक्तींनाच अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.राज्यात ५४ टक्के ‘सायबर’ गुन्हेगार तरुण दरम्यान,‘सायबर क्राईम’अंतर्गत संपूर्ण देशात सर्वात जास्त गुन्हेगारांना जेरबंद करण्यात महाराष्ट्र पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या ४२६ गुन्हेगारांपैकी २३१ जण हे तिशीच्या आतीलच आहेत. १७ गुन्हेगार तर चक्क १८ वर्षांखालील आहेत.
नात्यांमध्ये ‘आॅनलाईन’ छळवणुकीचा ‘व्हायरस’
By admin | Updated: July 14, 2014 08:48 IST