मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सर्व शाखांच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने होणार असल्याची घोषणा कुलगुरूंनी केली होती. पण, निविदा प्रक्रियेला मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादामुळे लाखो उत्तरपत्रिका पडून होत्या. अखेर मेरिट ट्रॅक या कंपनीची आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीसाठी मुंबई विद्यापीठाने निवड केली असून, ४ मेपासून उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला सुरुवात होईल. यामुळे विद्यार्थी, पालकांना दिलासा मिळाला असून, वेळेत निकाल लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुंबई विद्यापीठात मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या सर्व शाखांच्या परीक्षांची तपासणी आॅनलाइन होणार आहे. सर्व विद्या शाखांच्या विविध ४०६ परीक्षांच्या २२ लाख उत्तरपत्रिका आॅनस्क्रीन मार्किंग पद्धतीने तपासल्या जाणार आहेत. आॅनलाइन प्रक्रियेसाठी मुंबई विद्यापीठातर्फे निविदा मागवण्यात आल्या होते. पहिल्यांदा दोनच कंपन्या सहभागी झाल्याने मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर तीन कंपन्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर २७ एप्रिलला निविदा प्रक्रिया संपल्यावर २८ एप्रिल रोजी व्यवस्थापन परिषदेने कंपनी निश्चित करण्यात आली. महाविद्यालयामध्ये उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयांनी पुढाकार घेतल्यास सेंटरची संख्या वाढून ही प्रक्रिया अधिक जलदगतीने राबविता येईल. सर्व विद्या शाखेतील परीक्षांचे आॅनस्क्रीन मार्किंग करून मूल्यांकन करणे शक्य होणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले.या संगणक प्रणालीमध्ये मूल्यमापनाच्या वेगाची रिअलटाइम स्थिती संगणकावर दिसत असल्याने मूल्यमापनाच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे सोपे होणार आहे. तसेच शिक्षकांनी मूल्यमापन केलेल्या उत्तरपत्रिकांची संख्या आणि त्यांच्या मानधनाचे गणनसुद्धा रिअलटाइम करता येणार आहे. आॅनलाइन तपासणीमुळे विद्यार्थ्यांच्या पुनर्मूल्यांकनाचे निकाल देखील लवकर लावण्यास मदत होणार असून, उत्तरपत्रिकेची छायांकित प्रतही त्यांच्या ई-मेलवर पाठविण्याची तरतूद केली जाणार असल्याचे कुलगुरू देशमुख यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
आॅनलाइन तपासणी ४ मेपासून
By admin | Published: April 29, 2017 3:05 AM