मुंबई : मालाड मालवणी येथील विषारी दारूकांडातील बळींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीतून १ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी केली. ज्या कुटुंबातील कर्ता पुरुष या दुर्घटनेत मरण पावला त्या कुटुंबांना चरितार्थाकरिता सरकारच्या वतीने छोटे-मोठे साधन उपलब्ध करून देण्यात येईल, असेही तावडे यांनी सांगितले. विषारी दारू प्राशन केल्यामुळे मालवणीत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे.या प्रकरणी गुन्हे शाखेने आधीच पाच जणांना अटक केली आहे. त्यापाठोपाठ गावठी दारूच्या अवैध व्यवसायातील क्वीन ममता लक्ष्मण राठोड (३०) उर्फ ममता आण्टी उर्फ मनेका अक्का आणि अॅग्नेस ग्रेसी उर्फ ग्रेसी आण्टी या कुख्यात महिलांनाही गुन्हे शाखेने गजाआड केले. तावडे यांनी या परिसरास भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून मदत दिल्याचे तावडे म्हणाले. या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या पोलीस व उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन देत त्यांनी सहायक पोलीस आयुक्त फतेहसिंग पाटील व जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांच्याशी चर्चा केली.
मृतांच्या वारसांना एक लाखाची मदत
By admin | Updated: June 22, 2015 03:19 IST