मुंबई : नाशिकजवळील एकलहरे औष्णिक वीज प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे प्रदूषण होऊन शेतीचे मोठे नुकसान होत असेल, तर त्याची भरपाई प्रकल्पाकडूनच केली जाईल, असे आश्वासन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी विधानसभेत दिली. माजी मंत्री छगन भुजबळ आणि इतर सदस्यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकल्पातील कोळशाच्या राखेमुळे नागरिक त्रस्त असून, विहिरींमध्ये रासायनिक अंश सापडल्याचा मुद्दा भुजबळ यांनी मांडला. भुजबळ गेली १० वर्षे नाशिकचे पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी या मुद्द्यावर काय केले, असा चिमटा भाजपाच्या देवयानी फरांदे यांनी काढला़ मात्र प्रश्नाला रामदास कदम उत्तर देत असताना फरांदे यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारल्याने त्यांचा नवखेपणा जाणवला.या औष्णिक वीज प्रकल्पाने त्यांच्या प्रत्येक धुरांड्यासाठी हवा प्रदूषण नियंत्रणाकरिता इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर ही यंत्रणा बसवलेली आहे. या उद्योगाची पाहणी केली असता धुरांड्यामधून निघणाऱ्या धुलीकणाचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी संयुक्त आराखडा राबविण्यास सांगितले होते, त्यानुसार अंमलबजावणी सुरू आहे. मंडळाने या प्रकल्पाकडून प्रदूषण नियंत्रण सुधारणेसाठी १ कोटी २० लाख रुपयांची बँक हमी जमा करवून घेतली होती. मात्र संमतीपत्रातील अटींचे उल्लंघन झाल्याने त्यापैकी ५० लाख रुपयांची बँक हमी जप्त करण्यात आली आहे, असे रामदास कदम यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)
एकलहरेची नुकसानीची भरपाई प्रकल्पाकडूनच
By admin | Updated: March 17, 2015 01:13 IST