ऑनलाइन टीम
अहमदनगर, दि. ४ - शिवसेना-भाजपामध्ये युती ठेवायची की नाही यावरून चर्चा सुरू झालेली असतानाच एकदा सर्वच पक्षांनी स्वबळावर लढायला हवे म्हणजे सर्वांना आपापली ताकद कळेल असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर येथे केले.
गुरूवारी भाजपाच्या एका कार्यक्रमात शिवसेनेसोबत असलेली युती यापुढे न ठेवता भाजपाने राज्यातील विधानसभा स्वबळावर लढायला हवी अशी मागणी भाजपाचे मधु चव्हाण यांनी केल्याने महायुतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपाकडून आलेली ही मागणी शिवसेनेनेही गांभिर्याने घेतली असून २८८ जागांसाठी सज्ज राहावे असे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सूचना केली आहे. युतीबाबत चर्चा सुरू असतानाच शुक्रवारी अजित पवार यांनी आगामी निवडणुकांत राष्ट्रवादीला १४४ जागा दिल्या तरच आघाडी टिकेल अन्यथा पक्ष २८८ जागा लढेल असे वक्तव्य केले आहे. राज्यात आम्हाला अर्ध्या जागा मिळायला हव्या अशी मागणी करतानाच अजित पवार म्हणाले की, एकदा सर्वच पक्षांनी स्वबळावर लढायला हवे जेणेकरून सर्वांना आपापली ताकद कळेल. मोदी सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, मोदी सरकार शेतकरीहीत पाहत नाही. सिंचन घोटाळयावरून विनाकारण माझ्या बदनामीचा प्रयत्न करण्यात आला असेही अजित पवार म्हणाले.