अतुल कुलकर्णी/ लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : याआधीच्या पोलीस महासंचालकांनी निवृत्त झालेल्या व दिवंगत अधिकाऱ्यांचेही बदली आदेश काढून केलेला ‘विक्रम’ ताजा असतानाच काही दिवसांपूर्वी मंत्रालयातून केल्या गेलेल्या आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्यांच्या अनेक सुरस कथा समोर येऊ लागल्या आहेत. या चित्रविचित्र बदल्यांमुळे अधिकाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. नियमित बदल्या मे महिन्यात व्हाव्यात असे बदलीचा कायदा सांगतो. मात्र या सरकारमध्ये दर महिन्याला दोन चार बदलीचे आदेश निघत आहेत. परिणामी कोण कुठे काम करतो आहे याची यादी ‘अपडेट’ करणाऱ्यांची धावपळ उडत आहे. प्रत्येक मंत्री आणि आमदाराला आपल्या भागात स्वत:च्या पसंतीचे अधिकारी असावेत असे वाटते. त्यातच मध्यावधी निवडणूकांच्या शक्यतेची आवई उठल्याने प्रत्येकाला याचवेळी आपल्या आवडीचा अधिकारी नेमला नाही तर आपले काही खरे नाही असे वाटू लागल्याने कधी नव्हे ते यावेळी बदल्यांचा बाजार जरा जास्तच तापल्याचे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पुण्याहून साखर आयुक्त बिपीन शर्मा यांची कौशल्यविकास आयुक्त म्हणून बदली झाली. तो पदभार विजय वाघमारे यांच्याकडे होता. त्यांनी तो सोडला नाही म्हणून शर्मा यांना शिक्षण आयुक्त केले गेले आणि या सगळ्यात ज्यांचा कार्यकाळही पूर्ण झाला नव्हता त्या शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांना बदलीला सामोरे जावे लागले.खरा विक्रम झाला तो जळगाव जिल्ह्यात. जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांडे यांची बदली अकोला जिल्हाधिकारी म्हणून केली गेली आणि त्यांच्या जागी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील अप्पर आयुक्त (महसूल) डॉ. संजय कोलते यांची बदली झाली. पण दोन दिवसानंतर पुन्हा डॉ. कोलते यांची जळगावची बदली रद्द करुन त्यांना नागपूर येथे ‘मनरेगा’ आयुक्त म्हणून पाठविले गेले. पाच दिवसात पुन्हा गडचिरोलीचे सहाय्यक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची जळगाव जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली. आता ते रुजू झाल्याने त्यांना बदललेले नाही!मुंबईत झटपट घडामोडीपरभणीच्या पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांची २८ एप्रिलला चंद्रपूर येथे बदली करून त्यांच्या जागी नागपूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य दिलीप झळके यांची नियुक्ती झाली होती. परंतु झळके यांनी ४ मे पर्यंत परभणीचा पदभार स्वीकारला नव्हता. ४ मे रोजी परभणीच्या पोलीस अधीक्षकपदी पुणे येथील पोलीस उपायुक्त अरविंद चावरिया यांची नियुक्ती झाल्याचे आदेश काढण्यात आले. त्यानंतर मुंबईत घडामोडी घडल्या व ५ मे रोजी सकाळी ८ वाजता दिलीप झळके पदभार घेण्यासाठी नागपूरहुन परभणीत दाखल झाले. सकाळी ११ वाजता त्यांनी पोलीस अधीक्षकपदाचा पदभार घेतला. चावरिया यांचे आदेश निघण्यापूर्वी झळके ८ किंवा ९ मे रोजी परभणीचा पदभार घेणार होते; परंतु चावरिया यांचे आदेश निघताच झळके मध्यरात्रीच नागपूरहून कारने परभणीचा पदभार घेण्यासाठी निघाले व त्यांनी सकाळी पदभार घेतला. आता चावरिया यांना हिंगोलीला जाण्यास सांगितले आहे. परभणीत आपण काम केले असल्याने त्यापेक्षा लहान असलेल्या हिंगोलीत काम कसे करायचे? असा उद्विग्न सवाल त्यांना पडला आहे. हिंगोली येथील पोलीस अधीक्षक अशोक मोराळे यांची पुणे उपायुक्त म्हणून बदली झाली. त्यांच्या जागी बसवराज तेली यांची नियुक्ती झाली होती. मात्र तीही रद्द झाल्याचे वृत्त आल्याने तूर्त अतिरिक्त पोलिस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्याकडे पदभार आहे.चांगल्या कामामागे वणवणअकोल्यात चांगले काम करणारे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या वाट्यालाही वणवण आली. आधी त्यांची नांदेडला जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. तर नांदेड जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांची मुंबई येथे विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्षपदी बदली झाली. त्यांच्या जागेवर जी. श्रीकांत येणार होते. पुन्हा आदेश बदलले. जी. श्रीकांत यांना लातूरला पाठवले गेले आणि सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे नांदेडला जिल्हाधिकारीपदी रुजू झाले. बदलीसोबतच रद्दचेही आदेशघाऊक बदल्यांचे आदेश २७ एप्रिलला निघाले. पण ५ मे रोजी काढलेल्या आदेशाने सहाय्यक पोलीस आयुक्त विकास तोटावार, रविंद्र रामकृष्ण कापगते, पोलिस उपअधिक्षक नंदकिशोर भोसले पाटील यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या. तर मालेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते, तसेच मुरबाड व ठाणे ग्रामीण येथे बदली झालेले दत्तात्रय निघोट, संदीप गावित यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येतील असा आदेश आधी काढला गेलायं! तर रुपाली दरेकर, शशिकांत शिंदे, इश्वर कातकडे यांच्या बदल्या आदेशाधिन असे म्हटले गेले तर राजेंद्र मोरे यांची बदली १ जुलै २०१७ पासून अंमलात येईल असा अॅडव्हान्स आदेशही गृहविभागाने काढलाय! पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची बदली रद्द करण्यात आल्याचा आदेश ४ मे रोजी निघाला. २९ एप्रिल रोजीच्या बदली आॅर्डरमध्ये फैजपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढले जातील असे म्हटले आहे.अद्याप रुजू नाहीत : झळके यांच्या जागेवर राज्य महामार्गच्या पोलीसप्रमुख स्वाती भोर यांची बदली झाली होती, पण ती रद्द करण्यात आली, भोर यांना उस्मानाबादला पाठवण्यात आले. नागपूरला बदली झालेले पोलीस उपायुक्त राकेश ओला आणि श्वेता खेडकर तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि एस. दिघावकर हे अद्याप रुजू झालेले नाहीत. अकोल्याचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नागपूरहून राजेश कलासागर यांची बदली झाली; पण ते अद्याप रुजूच झालेले नाहीत.
धरसोड बदल्यांमुळे अधिकारी चक्रावले
By admin | Updated: May 7, 2017 04:59 IST