नागपूर : राज्यात नायलॉन मांजावरील बंदी हटविण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी नकार देत व्यापा-यांना ‘वेट अॅण्ड वॉच’ भूमिकेवर ठेवले. त्यासोबतच पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाची विक्री व वापर सुरू ठेवायचा की कायमची बंदी आणायची, यावर शासनाला १९ जानेवारीपर्यंत ठोस निर्णय घेण्याचे निर्देश देऊन मुख्य सचिवांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. या प्रकरणावर न्या़ अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली़ गेल्या १० वर्षांपासून ठोस निर्णय न घेतल्याने राज्य शासनाची न्यायालयाने कानउघाडणी केली. अनिश्चित धोरणामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हे टाळण्यासाठी पतंग उडविण्याच्या मोसमात नायलॉन मांजाची विक्री व वापर सुरू ठेवायचा की कायमची बंदी आणायची, यावर शासनाने ठोस निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.७ जानेवारी रोजी सहपोलीस आयुक्तांनी नायलॉन मांजाचा वापर, तर सीताबर्डीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी नायलॉन मांजा विक्रीवर बंदीचा आदेश जारी केला आहे. याविरुद्ध रिद्धी सिद्धी पतंग व्यापारी संघटनेने फौजदारी रिट याचिका दाखल केली होती़ (प्रतिनिधी)
नायलॉन मांजावरील बंदी कायम
By admin | Updated: January 13, 2015 02:56 IST