एलबीटी रद्द तर मिहानचा विकास होणार : विविध संघटनांच्या प्रतिक्रिया नागपूर : राजकीय वर्तुळातील अभ्यासू वक्ते, नेते, संवेदनशील व्यक्तिमत्त्व, अर्थतज्ज्ञ, समस्यांवर तोडगा काढण्याचे कौशल्य असलेले आणि विदर्भातील विविध समस्यांची जाण असलेला नेता राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होत असल्याने आता महाराष्ट्र नव्हे तर विदर्भ आणि नागपूरचा सर्वांगीण विकास निश्चितच होईल, असा सूर सामाजिक, व्यावसायिक आणि आर्थिक क्षेत्रातील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना काढला.तंत्रज्ञान आणि अर्थकारण याची आवड असलेला वकील असल्याने त्यांना क्षमतेची धोरणे ठरविताना आणि राबविताना खूप उपयोग होईल. वित्त पुरवठा आणि राजकीय व्यवस्थापनाचा त्यांना गाढा अभ्यास असल्याचा फायदा मिहानसारख्या आणि रखडलेल्या प्रकल्पांना मार्गी लावण्यासाठी निश्चित होईल. एलबीटीची खडान्खडा माहिती असल्याने तो रद्द करून व्यापाऱ्यांच्या आणि राज्याच्या हितासाठी एक वेगळी करप्रणाली लागू करतील, अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे. या लोकाभिमुख नेत्यामुळे नागपूरचे नाव उंचावून देशात नावलौकिक मिळेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.व्यवसायाला गती मिळेलमहाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनणे ही नागपूरसाठी गौरवाची बाब आहे. नागपूरचा युवा मुख्यमंत्री झाल्याने व्यवसायात मोठा बदल होऊन गती मिळेल. निधीअभावी थांबलेली कामे पुन्हा सुरू होतील. व्यवसाय वाढून उत्पन्न वाढेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर नागपूर अग्रेसर होईल. फडणवीस हे अर्थतज्ज्ञ असल्यामुळे वित्त विभाग ते आपल्याकडे ठेवतील आणि विविध राज्यातील वित्तमंत्र्यांच्या सशक्त कमिटीचे ते चेअरमन होऊन जीएसटी लागू करण्यासाठी प्रयत्न करतील.बी.सी. भरतीया, राष्ट्रीय अध्यक्ष, कॅट.आता केवळ विकासचमहाराष्ट्राला अभ्यासू आणि युवा मुख्यमंत्री मिळाल्याने आता केवळ विकासच होणार आहे. फडणवीस यांना विकासाची जाण आहे. एलबीटी रद्द होऊन व्यवसायाला गती देणारी सरळसोपी करप्रणाली राज्यात लागू होईल. मिहानमधील कंपन्यांना ऊर्जा आणि नवीन कंपन्यांना मिहानमध्ये बोलविण्याची ताकद केवळ फडणवीस यांच्यामध्ये असल्याने नागपूर आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल, शिवाय रोजगार उपलब्ध होईल. सर्वसामान्य, व्यावसायिक आणि उद्योजकांकडून त्यांना अपेक्षा असून त्या पूर्ण होतील, असा विश्वास आहे. जुल्फेश शाह, उपाध्यक्ष, सीए संस्था पश्चिम विभाग.विदर्भ राज्य विसरू नयेफडणवीस हे अभ्यासू, अर्थतज्ज्ञ आणि सर्व विषयांची जाण असलेला नेता आहे. राज्यच नव्हे तर विदर्भ आणि नागपूरचा विकास करताना स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा विसरू नये. भाजपाच्या जुन्या जाहीरनाम्यात हा मुद्दा नमूद आहे. आमच्याकडे जिल्हास्तरीय विकासाचे नियोजन आहे. विदर्भात पायाभूत सुविधांवर भर दिल्यास पर्यटनाला बळ मिळून आर्थिक विकासाला चालना मिळेल. मिहानमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प आणावेत. अपेक्षा खूप आहेत, त्या पूर्ण कराव्यात.देवेन पारेख, अध्यक्ष, वेद.जाचक एलबीटी रद्द करावाअभ्यासू मुख्यमंत्र्यांकडून बऱ्याच अपेक्षा आहे. अनुकूल प्रतिक्रिया आहे. सर्वप्रथम जाचक एलबीटी रद्द करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा. नरेंद्र मोदी आणि भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात एलबीटी रद्द करण्याचे नमूद केले आहे. फडणवीस यांनी एलबीटी रद्द करण्यासाठी व्यापाऱ्यांचे नेतृत्त्व केले आहे. नागपूरचा मुख्यमंत्री असल्याने व्यवसाय वाढेल. सरळसोप्या कर प्रणालीने बाहेर गेलेला उद्योग परत येईल. व्यापाऱ्यांमध्ये उत्साह असून अपेक्षा पूर्ण होतील.दीपेन अग्रवाल, माजी अध्यक्ष, एनव्हीसीसी.व्यवसाय वाढीस लागेलमिहानला गती मिळेल, एलबीटी रद्द होऊन व्यवसायात वाढ होईल आणि पायाभूत सुविधांसह उद्योग वाढीला लागेल, असा विश्वास उद्योजक आणि व्यापाऱ्यांमध्ये आहे. नागपूरचे मुख्यमंत्री असल्याने या क्षेत्रातील रखडलेल्या प्रकल्पांसाठी निधी आणून ते पूर्ण होतील. फडणवीस यांना विदर्भाची बारीकसारीक माहिती आहे. कौशल्य पणाला लावून ते नागपूर आणि विदर्भाचा विकास करतील. व्यावसायिकांच्या अपेक्षा पूर्ण करतील, असा विश्वास आहे. मयूर पंचमतिया, अध्यक्ष, एनव्हीसीसी.महाराष्ट्र येणार पहिल्यास्थानी गेल्या काही वर्षांत विकासाची गती संथ झालेला महाराष्ट्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पहिल्यास्थानी येईल, असा विश्वास आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भाला फायदा होईल. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार असल्याने मिहानचा निश्चित विकास होईल, शिवाय अनेक कंपन्या कामे सुरू करून रोजगार मिळेल.सर्व प्रकल्प मार्गी लागतील. पायाभूत सुविधांचा विकास आणि अन्य कामांमुळे विदर्भ हा प्रगत प्रदेश म्हणून ओळखला जाईल. तेजिंदरसिंग रेणू, सचिव, व्हीटीए.अपेक्षा पूर्ण व्हाव्यातफडणवीस हे अर्थतज्ज्ञ असल्यामुळे विदर्भात आर्थिक विकासाला चालना मिळेल. नागपूरचे असल्याने अनेक संघटनांना बऱ्याच अपेक्षा आहेत. केंद्र आणि राज्यात भाजपा सरकार असल्याने सर्वच प्रकल्पांना निधी मिळून ते पूर्ण होतील. जीएसटी लागू करण्यासाठी त्यांनी केंद्रस्तरावर प्रयत्न करावेत. विदर्भातील विविध समस्यांची त्यांना जाण असून विकास कामांवर त्यांचा भर राहील. मिहानचा विकास व्हावा आणि व्यावसायिक व व्यापाऱ्यांचा अपेक्षा पूर्ण कराव्यात. अश्विनी अग्रवाल, अध्यक्ष, सीए संघटना.विदर्भाचा विकास होणारकेंद्रात गडकरी आणि राज्यात देवेंद्र असल्याने विकासाच्या बाबतीत विदर्भ संपूर्ण देशात अग्रस्थानी राहील. याशिवाय धान्य व्यवसायाशी संबंधित समस्यांवर तोडगा काढून त्या निकाली काढतील, अशी अपेक्षा आहे. फडणवीस यांना एलबीटीची माहिती असल्याने प्रारंभी हा जाचक कर रद्द करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. विदर्भाचा विकास, पायाभूत सुविधा, मिहानला पुन्हा बळकटी आणि रोजगार उपलब्ध करून देण्यावर ते भर देतील, असा विश्वास आहे. प्रताप मोटवानी, सचिव, धान्य असोसिएशन.एलबीटीचा विसर पडू नयेस्वातंत्र्यानंतर नागपूरचा मुख्यमंत्री होणे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. विदर्भ आणि नागपूरचा निश्चितच विकास होईल. प्रारंभी त्यांनी व्यापाऱ्यांसाठी अडथळा ठरलेला एलबीटी रद्द करून दिलासा द्यावा. एलबीटी रद्द करण्यासाठी चेंबरने उभारलेल्या आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले होते. त्याचा विसर त्यांना पडू नये. व्यापाऱ्यांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. एलबीटी रद्द करण्यासाठी पुन्हा आंदोलन होऊ नये, अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे. मनुभाई सोनी, सचिव, एनव्हीसीसी
आता विकासच होणार!
By admin | Updated: October 29, 2014 00:38 IST