पानपट्टीचालकांवर संक्रांत : सुगंधित तंबाखूच्या मिश्रणाला ग्रहण नागपूर : गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या बंदीनंतर नागपुरातील तंबाखूप्रेमींनी आपला मोर्चा खर्राकडे वळविला. नागपुरी खर्रा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूपासून तयार होत असल्याने तोसुद्धा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. पहिल्याच कारवाईत धंतोली, यशवंत स्टेडियमजवळील तीन पानपट्टीवर शनिवारी धाड मारून अधिकाऱ्यांनी सहा हजार रुपये किमतीचा ५.५ किलो सुगंधित तंबाखूमिश्रित खर्रा जप्त केला. नागपुरात जवळपास अडीच हजार पानपट्टीचालक आहेत. सर्वांकडे खर्राची विक्री सकाळी ७ वाजेपासून सुरू होते. मोठ्या जागेतील पानपट्टीवर खर्रा तयार करणारे नोकर आहेत. अनेकांनी खर्रा तयार करण्यासाठी मशीन लावल्या आहेत. सकाळपासूनच हा व्यवसाय सुरू होतो. या दुकानरूपी पानपट्ट््यांवर धाडी टाकल्यास दररोज किलो-किलो खर्रा जप्त होऊ शकतो. नव्याने रुजू झालेले अन्न प्रशासन विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांच्या आदेशानंतर अधिकारी कामाला लागले आहेत. पहिल्या दिवशी अर्थात शनिवारी सहायक आयुक्त एन.आर. वाकोडे यांच्या चमूने धाडी टाकल्या. धाडीमुळे या परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. चोरट्या मार्गाने नागपुरातील आलेला गुटखा दुपटीत विकण्यात येत असल्याने खर्ऱ्याची मागणी वाढली आहे. रोजगारासाठी सुगंधित तंबाखूमिश्रित खर्रा विकावा लागतो. धाडीची चिंता नाही, जे होईल ते पाहून घेईल, अशी प्रतिक्रिया धंतोली येथील एका पानपट्टीचालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. प्रारंभी गुटखा बंदी, नंतर सुगंधित तंबाखूवर बंदी टाकल्याने व्यवसाय संकटात आल्याचे त्यांनी सांगितले. सुपारीच्या किमती आकाशाला भिडल्याने खाणारेही कमी झाले आहेत. दिवसाला दोन खर्रा खरेदी करणारा आता एकच विकत घेत आहे. या सर्वांचा परिणाम व्यवसायावर झाला आहे. विभागाने खुशाल कारवाई करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)
आता खर्रा बंदी!
By admin | Updated: July 21, 2014 00:59 IST