मुंबई : आगामी विधानसभेची निवडणूक काँग्रेससोबतच लढू. जिंकण्याचा निकष लावून जागा मागितल्या जातील, असे स्पष्ट करत आमच्यातील काही जणांनी 144 जागांवर दावा केला असला तरी पक्षाचा अध्यक्ष मी आहे. धोरणात्मक निर्णय सर्वाशी चर्चा करूनच घेतला जातो, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वबळाची भाषा करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना फटकारले.
मुस्लिम नेते आणि राज्यसभेतील माजी खासदार मौलाना ओबेदुल्लाह खान आझमी यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर, पवार म्हणाले, जागावाटपाचा प्रश्न सुटला की, प्रचाराची दिशा व इतर बाबींचा तपशील राज्यस्तरावर ठरविला जाईल. मुख्यमंत्री बदलाबाबत माझी काँग्रेस नेत्यांशी कोणतीच चर्चा झाली नाही. माध्यमांनी अशा प्रकारच्या बातम्या पेरल्याचा आरोप पवारांनी या वेळी केला. मात्र, विधानसभा निवडणुकीत आघाडीचे नेतृत्व करण्याबाबतची सूचना काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांनीच माङयाकडे केली. याबाबत तीन वेळा बैठका झाल्या, मात्र या बैठकांना मुख्यमंत्री उपस्थित नव्हते, असा खुलासाही त्यांनी केला.
आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी सज्ज झाली आहे. ऑगस्ट महिन्यात संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर स्वत: विविध जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. राज्यातील जनतेने तीन वेळा आम्हाला संधी दिली आहे. येत्या निवडणुकीतही याची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास पवार यांनी या वेळी व्यक्त केला.
ट्राय दुरुस्तीला विरोध नाही
ट्राय दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस विरोध करणार नसल्याचे शरद पवार यांनी आज स्पष्ट केले. यापूर्वीही निवृत्त अधिका:यांना शासकीय सेवेत घेण्यात आले आहे. त्यामुळे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्र यांच्यासाठीच्या विधेयकास टोकाचा विरोध करण्याची गरज नसल्याचेही पवार म्हणाले.
‘ती’ बातमी विनोदी!
सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ शिवसेनेत जाणार, ही एक विनोदी बातमी आहे. आजकाल बातम्या तयार करणारे कारखाने तयार झाले आहेत. काही काम नसताना रिकामटेकडेपणाने ही ‘टेबल स्टोरी’ बनवण्यात आल्याचे पवारांनी सांगितले.