खामगाव : धान्याची अफरातफर करणार्यांचा शोध घेण्यासाठी २५ स्कॉड तयार करण्यात आले असून, धाडी टाकण्याचे प्रमाण वाढणार आहे. धान्याची अफरातफर करणार्यांची गय केल्या जाणार नसून, कडक कारवाई करता यावी, यासाठी सदरचा गुन्हा अजामीनपात्र करण्यासाठी लवकरच कायदा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा संसदीय मंत्री गिरीश बापट यांनी दिली. खामगाव येथे ८ मे रोजी एका कार्यक्रमानिमित्त आले असता स्थानिक खामगाव अर्बन बँकेच्या माधव सभागृहात दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. पत्रकार परिषदेला ना.गिरीश बापट यांच्यासह आ.भाऊसाहेब फुंडकर, आ.डॉ.संजय कुटे, आ.अँड.आकाश फुंडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. ना.बापट यांनी पुरवठा विभागातील कामकाज गतिशील होण्यासाठी संगणकीकरण करण्यात येत असल्याचे सांगितले. ११ ते साडेअकरा कोटींच्या किम तीचे धान्य अफरातफर राज्यभरात होत आहेत. हे गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात यापुढे बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब होणार असून, त्याला आधार क्रमांक लिकिंग केल्या जाणार आहे. त्यामुळे धान्य अफरातफरचे प्रकार टळणार आहेत. शिधापत्रिका बायोमेट्रिक करून आधार क्रमांकाशी लिकिंग करण्यात येत आहे. हे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी गावातील पोलीस पाटील, आशा वर्कर व कर्मचार्यांची सुद्धा मदत घेतली जाणार आहे. आधार संलग्निकरणाचे काम ८५ टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित १५ टक्केमध्ये शाळेत न जाणारी बालक, लहान मुले यांचेच आधार नाही. त्यामुळे लवकरच मोहिमेद्वारे आधार लिकिंग पूर्ण केल्यानंतर बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वाटप होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
धान्याची अफरातफर केल्यास अजामीनपात्र गुन्हा
By admin | Updated: May 9, 2015 01:54 IST