रफिक कुरेशी/ऑनलाइन लोकमतमेहकर, दि. 17 - येथील प्रभाग क्र. २ मधील काही भाग शहराच्या हद्दीबाहेर असल्याचे निवडणूक विभागाने निश्चित केल्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत या भागातील सुमारे ३ हजार नागरिकांना आपल्या पवित्र मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांबरोबरच या प्रभागातील विद्यमान नगरसेवक व इच्छुक उमेदवारामध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार प्रभाग क्र. २ ची लोकसंख्या जवळपास ७ हजार एवढी असून मतदार संख्या ४ हजार १९६ एवढी आहे. मागील ३० वर्षापासून या भागातील नागरिक नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावतात. हा संपूर्ण प्रभाग अधिकृत पालिकेच्या हद्दीत असल्यामुळे या प्रभागातील नागरिकांना मागील ३० वर्षापासून नगर पालिका मूलभूत सुविधा पुरवित आहे. सध्या या प्रभागाचे विद्यमान नगराध्यक्षा हसीनाबी कासम गवळी, कल्पना निकस, अशोक अडेलकर आणि संजय जाधव हे नगर सेवक नेतृत्व करीत आहेत. मागील पाच वर्षात विद्यमान नगराध्यक्षा हसीनाबी कासम गवळी यांनी या प्रभागामध्ये रस्ते, नाल्या, विद्युत सुविधा, नळयोजना यासह अन्य विकासाची कामे केली. जवळपास ५ कोटी रूपयाची कामे झाल्याचा दावा नगराध्यक्षांनी केला आहे. नगर पालिकेच्या निवडणूका जाहीर झाल्यानंतर नगर पालिकेने नियमानुसार शासनाच्या निकषानुसार शहरातील १२ प्रभागाचे प्रस्ताव निवडणुक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर केले. त्यानंतर प्रशासनाने नविन प्रभाग रचनेवर हरकती मागितल्या. यामध्ये प्रभाग २ मधील प्रभाग रचनेवर काहींनी हरकती घेतल्या. यामध्ये प्रभाग दोनचा काही भाग हा हद्दीबाहेरचा असल्याचे म्हटले होते. त्यानुसार प्रशासनाने या प्रभागातील जवळपास ३ हजार मतदार हे हद्दीबाहेरचे ठरवून त्यांच्या मतदानाचा अधिकार काढून घेतला. त्यामुळे मागील ३० वर्षापासून पालिकेच्या निवडणूकीत मतदान करणाऱ्या या मतदारांना येणाऱ्या निवडणुकीत मतदानाच्या पवित्र हक्कापासून वंचित रहावे लागणार आहे.या भागातील मतदार राहणार वंचितप्रभाग २ मधील ज्या भागातील मतदारांना वगळण्यात आले यामध्ये पैनगंगा वसाहत, शिक्षक कॉलनी, पटवारी कॉलनी, पवनसुत नगर, बालाजी नगर, तेजस्वी कॉलनी, गजानन नगर, समता नगर, संताजी नगर, चनखोरे कॉलनी, पेनटाकळी कॉलनी या नगराचा समावेश आहे.या मतदारांसाठी न्यायालयात जाऊया प्रभागातील काही भाग पुनर्वसित असला तरी मागील ३० वर्षांपासून या भागातील नागरिकांना मेहकर नगर पालिकेत समाविष्ठ करण्यात आले आहे. त्यानुसार पालिका या नागरीकांना मुलभुत सुविधा पुरवित आहे. एवढेच नव्हे तर वर्षाकाठी नगर पालिकेला या भागातील नागरीक ७० लाख रुपये कराचा भरणा करीत असतात. असे असाताना अचानक हे नागरीक हद्दीच्या बाहेरचे कसे झाले? असा सवाल उपस्थित करून माजी नगराध्यक्ष कासाम गवळी म्हणाले की, या नागरीकांच्या हक्कासाठी आपण न्यायालयात जाणार आहोत. व त्यांना त्यांचा मतदानाचा पवित्र हक्क आपण मिळवून देवू असेही कासम गवळी म्हणाले.मागील पाच वर्षाच्या काळात या प्रभागात सुमारे पाच कोटी रुपयांची विकासाची कामे केली. त्यामुळे या भागातील नागरिकांना अनेक सुविधा मिळाल्या आहेत. तर, येथील नागरिक नियमित कराचा भरणा करतात. त्यामुळे त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे.- हसीनाबी कासम गवळी नगराध्यक्षा, मेहकर
न. प. निवडणुकीत ३ हजार मतदार राहणार मतदानापासून वंचित
By admin | Updated: August 17, 2016 17:59 IST