दिल्लीत भेट : फडणवीसांच्या शब्दांनी गडकरींचा दाटला कंठ
रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
कालर्पयत मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत जे एकमेकांचे स्पर्धक मानले जात होते, ते दोघे आज जेव्हा एकत्र आले तेव्हा दोघांच्याही चेह:यावर विजयी उल्हास होता. माझा आशीर्वाद तुला आहेच, होता व नेहमीच राहील, असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मिठाई भरविली. त्यावर मिठाईचा गोडवा जिभेवर ठेवत ‘नितीनजी, डोक्यावर हात असू द्या, मी महाराष्ट्र घडवतो की नाही बघा.!’ असा आशीर्वाद फडणवीसांनी मागताच गडकरी सद्गदित झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि इतर मान्यवरांना शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण घेऊन नवनियुक्त मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्लीत दाखल झाले होते. विमानतळावर उतरताच फडणवीसांची गाडी गडकरींच्या मोतीलाल प्लेस नव्या शासकीय बंगल्यावर धडकली. आपल्या शागिर्दाच्या स्वागतासाठी गडकरींनीही जय्यत तयारी केलेली. गडकरी स्वत: त्यांच्या स्वागतासाठी दारापुढे आले. देवेंद्र, तू मुख्यमंत्री झाल्याने मला खूप आनंद झाला; माझा तुला कायम आशीर्वाद राहील, सांगत गडकरींनी पेढा भरवून कौतुक केले. ‘तुमचा हात डोक्यावर असू द्या, मी महाराष्ट्र घडवतो की नाही ते बघा,’ असे उद्गार फडणवीसांच्या तोंडून निघाले. गडकरींनीही त्यांना यशस्वी होण्याचा आशीर्वाद दिला.
मी सोबत आहे!
मी, पक्ष आणि जनता तुमच्यासोबत आहे. लोकांची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवा, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या.
1 तू महाराष्ट्र नक्की घडवशील मला खात्री आहे, असे सांगून पुष्पगुच्छ व शाल देऊन गडकरींनी फडणवीसांना आलिंगन दिले. दोघेही कमालीचे भावूक झाले होते. त्यानंतर ते दोघे घरात गेले. एक तास त्यांनी चर्चा केली. त्यावेळी काहीवेळ केंद्रीय मंत्री निर्मला सितारामनही तेथे उपस्थित होत्या. तिघांनी जेवण घेतले, त्यानंतर फडणवीस व गडकरी हे निवासस्थानामागील हिरवळीवर गेले.
2फडणवीस यांनी त्यांना काही कागदपत्रे दाखविली. तेथील खुच्र्यावर बसून काहीवेळ गंभीर चर्चाही ते करत होते. साधारणत:
अर्धा तासाच्या या चर्चेनंतर दोघेही पत्रकारांपुढे आले, पण कोणतेही भाष्य़ न करता फडणवीस थेट अमित शहा यांच्या भेटीला निघून गेले. शहा यांनीही फडणवीस यांचे पुष्पगुच्छ व शुभेच्छापत्र देऊन स्वागत केले. शहादेखील त्यांच्या दरवाज्यावर हाती पुष्पगुच्छ घेऊन उभे होते.