नवी दिल्ली: निवडणुकीच्या निमित्ताने येणाऱ्या ‘लक्ष्मी’ला नाकारू नका, असे सभेत भाषण करून मतदारांना मोबदला घेऊन मतदान करण्यास उद्युक्त केल्याबद्दल काढलेल्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाने केंद्रीय मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना तीन दिवसांची मुदतवाढ दिली आहे.निलंगा येथील प्रचारसभेत ५ आॅक्टोबर रोजी केलेल्या वरील आशयाच्या कथित भाषणाबद्दल आयोगाने गडकरी यांना नोटीस काढली होती व उत्तर देण्यासाठी बुधवार ८ आॅक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती. या मुदतीत उत्तर न देता गडकरी यांनी आणखी १० दिवसांची वेळ देण्याचे पत्र आयोगाला लिहिले. महाराष्ट्र व हरियाणात निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याचे कारण देऊन त्यांनी ही वाढीव मुदत मागितली होती. मात्र आयोगाने १० ऐवजी तीन दिवसांची वाढीव मुदत दिली आहे. त्यानुसार गडकरी यांना आता १० आॅक्टोबरच्या सा. ५ पर्यंत उत्तर दाखल करावे लागणार आहे. आयोगाला उत्तर देण्यास वेळ पुरेसा नाही, असे सांगणाऱ्या गडकरी यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना या विषयी आपली भूमिका स्पष्ट केली होती, हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे. (विशेष प्रतिनिधी)
नितीन गडकरींना आयोगाची मुदतवाढ
By admin | Updated: October 9, 2014 04:50 IST