राजेश शेगोकार, बुलडाणाग्राम स्वच्छतेबाबत ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धा निर्माण करणारी ‘निर्मलग्राम पुरस्कार योजना’ खंडीत करण्याचे आदेश राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने ६ नोव्हेंबरला दिले आहेत. केंद्र शासनाच्या सहकार्याने राज्य शासनाने २००३ पासून राज्यात निर्मलग्राम योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गंत गावागावात शौचालय बांधण्याची चळवळ सुरू झाली. अनेक ग्रामपंचायतींनी निर्मलग्राम योजनेत सहभाग घेऊन गाव हागणदरी मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला होता. आपले गाव निर्मल व्हावे म्हणून गावांमध्ये स्पर्धा सुरू होती. अनेक ग्रामपंचायतींनी पुरस्कारही पटकावले होते. शासनाच्या आदेशाने आता हागणदारी मुक्तीची स्पर्धाच संपुष्टात येणार आहे. या संदर्भात पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग सांभाळणारे बुलडाणा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी यादव यांना विचारले असता, हे पत्र आल्याचे त्यांनी सांगितले.२००५ ते २०१५ पर्यंत एकूण ६४ ग्रामपंचायतींना निर्मलग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्राप्त गावाच्या विकासासाठी अतिरिक्त निधी देण्यात आला. त्यातून विकासाची कामे झाली. सपूर्ण स्वच्छता अभियान व निर्मल भारत अभियानांतर्गत ग्रामंपचायतीमध्ये स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी व स्वच्छतेबाबत लोकचळवळ निर्माण करण्यासाठी निर्मल ग्राम पुरस्काराचे सन २००३ पासून मोठे योगदान होते. केंद्र शासनाच्यावतीने दिला जाणारा हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जात होता.
निर्मलग्राम पुरस्कार योजना खंडित!
By admin | Updated: November 11, 2015 02:38 IST