स्नेहा पावसकर, ठाणेगणपती बाप्पांना भक्तगण सोमवारी निरोप देतील आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रणही मोठ्या भक्तिभावाने देतील; परंतु पुढच्या वर्षी बाप्पा लवकर नव्हे तर उशिरा येणार आहेत. अधिक मासामुळे त्यांना २० दिवस विलंब होेणार आहे. २०१५ मध्ये बाप्पांचे आगमन १७ सप्टेंबरला, तर १० दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन २७ सप्टेंबरला होणार आहे.२०१३च्या तुलनेत २०१४ मध्ये बाप्पांचे आगमन १२ दिवस लवकर झाले. परंतु पुढच्या वर्षी बाप्पाच्या आगमनासाठी भक्तांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. २०१५ मध्ये येणाऱ्या अधिक मासामुळे बाप्पाचे आगमन लांबले आहे. बुधवार, १७ जून ते १६ जुलैदरम्यान अधिक आषाढ, तर १७ जुलै ते १४ आॅगस्टदरम्यान नीज अर्थात खरा आषाढ आहे. नीज आषाढादरम्यान सोमवार, २७ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. गुुरुवार, १७ सप्टेंबर ते रविवार, २७ सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सव साजरा होणार आहे. शनिवार, १९ सप्टेंबरला गौरींचे आगमन, २० सप्टेंबरला गौरीपूजन तर सोमवार, २१ सप्टेंबरला गौरींसोबतच्या गणपतींचे विसर्जन होईल. तर अनंत चतुर्दशी रविवार, २७ सप्टेंबरला येणार आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच पुढील वर्षी अधिक मासामुळे नवरात्र, दसरा, दिवाळी असे सर्वच सण सुमारे २० दिवस उशिराने येणार आहेत, अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.नाशिक त्र्यंबकेश्वर येथे मंगळवार, १४ जुलै २०१५पासून सिंहस्थ कुंभपर्व सुरू होणार आहे. हे कुंभपर्व गुरू सिंह राशीत असेपर्यंत म्हणजे गुरुवार, ११ आॅगस्ट २०१६पर्यंत असणार आहे.तर त्र्यंबकेश्वर येथे पहिले शाही स्नान शनिवार, २९ आॅगस्ट २०१५ रोजी होणार आहे, असेही सोमण यांनी सांगितले.
पुढच्या वर्षी २० दिवस उशिरा
By admin | Updated: September 8, 2014 03:00 IST