नवी मुंबई : रविवारी पावसाने दमदार हजेरी लावली, सोमवारीही हाच जोर कायम होता. संततधार पावसाने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल झाले. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने ऐन कार्यालयीन वेळेत लोकल १५ ते २० मिनिटांनी उशिराने धावत असल्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसला. सकाळी १० नंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला असून दुपारनंतर पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने प्रवासी हैराण झाले. मुंबई-पुणे तसेच बेलापूर-ठाणे मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. शहरातील बस डेपो, भुयारी मार्ग तसेच सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घटल्या. महानगरपालिकेचा आपत्कालीन विभाग तसेच अग्निशमन दलाच्या वतीने पाण्याचा निचरा करण्यात आला. दिवसभरात २५.८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मोरबे धरणाच्या जलपातळीतही वाढ झाली असून ७५.३० मीटर इतकी नोंद झाली आहे. रविवारी दिवसभरात मोरबे धरण क्षेत्रात २८८.०८ मिमी पावसाची नोंद झाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सहा ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. सानपाडा सेक्टर चार, दत्तगुरु सोसायटी परिसरात झाड पडल्याने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आपत्कालीन विभागाच्या वतीने देण्यात आली. वाशी सेक्टर १७ परिसरात झाड पडल्याने चारचाकी गाडीचे नुकसान दिले. महानगरपालिकेचे आत्पकालीन विभाग तसेच अग्निशमन दलाच्या वतीने तत्काळ मदत पोहोचविल्याने पावसामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर झाल्या. (प्रतिनिधी)
दुसऱ्या दिवशीही धुवांधार
By admin | Updated: August 2, 2016 02:42 IST