पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँगे्रसची एकहाती सत्ता आहे. या महापालिकेत दोन वर्षांपूर्वी आयुक्तपदी आलेले राजीव जाधव हे दादांसह पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतले अधिकारी होते. राष्ट्रवादी काँग्रेसची कामेही मनाप्रमाणे होत होती. मात्र, निवडणुकीच्या तोंडावरच त्यांची मुदतपूर्व बदली झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तर युतीचे कार्यकर्ते महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी तयारीला लागले आहेत. त्यामुळेच आयुक्तांची मुदतपूर्व बदली करण्यात आल्याची चर्चा आहे.महापालिकेत गेली दोन वर्षे कार्यरत असलेल्या राजीव जाधव यांची बुधवारी रात्री आदिवासी विभागाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली. तर नवी मुंबईत आयुक्तपदी काम केलेले दिनेश वाघमारे हे आता पिंपरीचे नवे आयुक्त असतील. मात्र, जाधव यांच्या बदलीमुळे राष्ट्रवादी काँगे्रसची बरीच ‘गणिते’ बिघडल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या बदलीने सत्ताधारी अस्वस्थ आहेत. दोन वर्षांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या जवळचे मानले जाणारे राजीव जाधव यांना पिंपरी-चिंचवडमध्ये आणले. येथे राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असल्याने जाधव यांनाही काम करण्यात फारशी अडचण आली नाही. सत्ताधारी पदाधिकाऱ्यांशी त्यांचा चांगला समन्वय होता. विविध कामे सत्ताधाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे होत होती. त्यातच आता निवडणुका जवळ आल्याने त्यांच्यामार्फत अनेक कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या तयारीत असलेल्या सत्ताधाऱ्यांना जाधव यांच्या बदलीमुळे झटका बसला आहे. केंद्रात आणि राज्यात युतीची सत्ता असली, तरी महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीचीच सत्ता आणण्यासाठी त्यांचे नेते, पदाधिकारी तयारीत आहेत. मात्र, राष्ट्रवादीला धक्का देण्यासाठी युतीतील नेत्यांनी नवीन आयुक्त आणल्याचे बोलले जात आहे. आयुक्तांची बदली होताच राष्ट्रवादीच्या पक्षनेत्यांनी ही बदली रद्द करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे नमूद केले. यावरूनच जाधव यांची बदली राष्ट्रवादीसाठी नुकसानकारक असल्याची चर्चा आहे. एखादा महत्त्वाचा विषय असो, की अन्य काही विषय, आयुक्तांच्या घरी जाऊनदेखील ‘तो’ विषय मार्गी लागायचा. त्यामुळे कार्यालयीन वेळ अपुरा पडतो म्हणून आयुक्त जाधव अधिकारी, पदाधिकाऱ्यांना घरी बोलावून उर्वरित कामे पूर्ण करायचे. मात्र, नवीन आयुक्तांकडून अशा प्रकारची कामे होतील की नाही, याबाबत शाश्वती नसल्याने सत्ताधाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आयुक्त जाधव यांची बदली हाच शहरात चर्चेचा विषय झाला आहे. शहरातील आणखी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना बदलीला सामोरे जावे लागणार का? असा प्रश्न अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. तसेच अनेक वर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांनाही बदलीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे अनेकजण नाराज असल्याचे चित्र दिसत आहे. (प्रतिनिधी)>... ही असू शकतात बदलीची कारणेमहापालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने वॉर्डातील कामे पूर्णत्वास जाणे महत्त्वाचे आहे. मागील महिन्यात पुनावळे येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाची बैठक बोलावली होती. या बैठकीस आयुक्त राजीव जाधव उपस्थित राहिल्याने भाजपाने याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. यामुळेदेखील जाधव यांची बदली झाल्याचे बोलले जात आहे. नव्या ठेकेदारांना करायचा आहे शिरकावमहापालिकेत अनेक वर्षांपासून जुन्याच ठेकेदारांची चलती आहे. बरेचसे ठेकेदार सत्ताधाऱ्यांच्या जवळचे आहेत. आयुक्तच मर्जीतील असल्याने सत्ताधाऱ्यांची सर्वच कामे ‘पद्धतशीर’ होत असल्याने इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी संबंधित असलेल्या नवीन ठेकेदारांना येथे शिरकाव करणे कठीण जात आहे. त्यामुळे आयुक्तांच्या बदलीमुळे परंपरागत ठेकेदारांना विश्रांती देत नवीन ठेकेदारांची एंट्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता
By admin | Updated: April 30, 2016 01:08 IST