वाडा : तालुक्यातील नेहरोली गावच्या हद्दीत असलेल्या नाल्यावर गेल्या जून महिन्यामध्ये बांधलेल्या बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे व नियमबाह्य पद्धतीने केले असल्याने त्याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थ व मनसेचे कार्यकर्ते नितीन भोईर, विक्रांत भोईर यांनी गटविकास अधिका-यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. नेहरोली गावच्या नाल्यावर शासनाच्या पाटबंधारे विभागाकडून एक बंधारा मंजूर करण्यात आला असून त्याचे काम अर्शद मणियार या ठेकेदाराला देण्यात आले आहे. या साठी १० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून जूनमध्ये हे काम सुरू केल्याने व नंतर पाऊस झाल्याने ते अर्धवट राहिलेले आहे. या बंधाऱ्यापासून किमान २५ ते ३० फूट अंतरावर बंधारा असताना सुद्धा या बंधाऱ्याला मंजुरी देण्यात आली आहे. शासनाच्या नियमानुसार पाचशे मीटर अंतरापर्यंत दुसरा बंधारा बांधता येत नाही. मात्र शासनाचे नियम पायदळी तुडवून अधिकारी व ठेकेदाराने संगनमत करून निधी लाटण्यासाठी बंधाऱ्याचे काम केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. काम अपूर्ण असतांनाही त्याचा ९० टक्के निधी कंत्राटदाराने पदरात पाडून घेतल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.बंधारा सिमेंट काँक्रिटचा असताना सुद्धा या मध्ये मोठ्या प्रमाणात दगडांचा वापर केला आहे. बांधकामासाठी आणलेले मोठे दगड आजही इथे पाहायला मिळतात . पावसाळा सुरू असूनही बंधाऱ्यात दोन ते तीन फूट पाणी ही अडून राहू शकत नाही. हा बंधारा पाणी अडविण्यासाठी आहे की शासनाचे पैसे जिरवण्यासाठी आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे. शासनाच्या निधीचा गैरवापर करणाऱ्या संबंधित ठेकेदार व त्यांना सहकार्य करणाऱ्या अभियंत्याची चौकशी करून कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडल असा इशारा तक्र ारीत दिला आहे. याबाबत पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता स्वामी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलणे टाळले. (वार्ताहर)
नेहरोली बंधारा निकृष्ट, अपूर्ण बिल मात्र अदा, चौकशीची मागणी
By admin | Updated: July 31, 2016 03:09 IST