देवेंद्र फडणवीस : पंतप्रधानांशी चर्चा करण्याचे आश्वासनमहाड : रायगड किल्ल्याच्या दुरवस्थेबद्दल खंत व्यक्त करत किल्ल्याच्या विकासात अडसर ठरणाऱ्या पुरातत्व खात्याच्या कायद्यामध्ये बदल होणे गरजेचे असून त्याबाबत पंतप्रधानांनी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.शनिवारी छत्रपती शिवरायांच्या ३३५ व्या शिवपुण्यतिथीनिमित्त किल्ल्यावरील राज दरबार येथे कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री म्हणाले, अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांचे सर्वात उंच व भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. ते भारताची वेगळी ओळख करून देईल. कार्यक्रमाच्या सुरूवातीला १०१ मराठा बटालियनच्या बॅन्ड पथकाने शिवरायांना मानवंदना दिली. मुख्यमंत्र्यांनी रायगडावरील समाधीस्थळी जाऊन शिवरायांना अभिवादन केले. तसेच जगदीश्वराचे दर्शन घेतले. निवृत्त एअर चिफ मार्शल गुलशन गोखले, सरसेनापती धनाजीराव जाधव यांचे वंशज उदयसिंह जाधव यांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला. तुकाराम जाधव यांना श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी किल्ले रायगडासाठी रस्त्यांची पुनर्बांधणी, चित्तदरवाजा ते गडावर जाणाऱ्या पायऱ्यांचे बांधकाम, स्वच्छता गृह, बाजारपेठ ते समाधीपर्यंतच्या मार्गाची दुरूस्ती तसेच रोपवेच्या विकासाचे त्यांनी आश्वासन दिले. सागरी मार्गावरील बाणकोट नदीवरील ३०० कोटींच्या पुलाचे काम त्वरीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)