ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. १४ - जिल्ह्यातील घरगुती, व्यापारी, औद्योगिक, पाणीपुरवठा, शेतीपंप, पथदीप व इतर अशा ५ लाख ६६ हजार १५७ वीजग्राहकांकडे १९ कोटी १५ लाख ८६ हजार ६५० रूपयांची वीजबिले थकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यातील शेतक-यांकडे असलेली वीजबिलाची थकबाकी ३ कोटी ४१ लाख ८५९ रुपयांवर गेली असून दिवसेंदिवस हा आकडा वाढतच चाललेला आहे. दुष्काळग्रस्त भागाबरोबरच अन्य गावांमधूनही शेतकºयांनी कृषीपंपाची वीजबिले थकविली असल्याने महावितरणला आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे.
शेतक-यांच्या वीजजोडण्या बिल थकविले तरीही तोडायच्या नाहीत, या राज्य सरकारच्या भूमिकेमुळे महावितरण कंपनीला फटका बसत आहे. त्याचा भार पयार्याने घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांना बसत आहे.
महावितरणचा आर्थिक परिस्थिती कमकुवत
राज्यातील शेतक-यांनी थकवलेले वीज बिल वसुल करण्यासाठी कोणतीही प्रभावी उपाययोजना आखली जात नसल्याने कृषी पंपाच्या विजेची थकबाकी तब्बल १९ कोटी रूपयांच्या जवळपास पोहचली आहे. राजकीय पक्षांचा दबाव आणि सरकारचा हस्तक्षेप यामुळे शेतकºयांकडील थकबाकी कमी होण्याऐवजी वाढत गेली आहे. ही थकबाकी वसूल झाली नाही तर महावितरणचा आर्थिक परिस्थिती कमकुवत होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे़
दुष्काळामुळे वसुलीला अडथळा
सलग तीन-चार वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतीपंपधारक शेतकºयांनी शेती पंपाच्या विजेचे बिल भरलेले नाही. राज्य सरकारने जिल्ह्यातील बहुतांश गावामध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळी परिस्थितीत कृषी वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यावर सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे गेल्या चार-पाच वर्षात कृषी पंपाच्या थकबाकीचा आकडा दुप्पट झाल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.
असे आहे महावितरणचे जाळे
प्रकार ग्राहक
घरगुती१ लाख ९५ हजार ५३
व्यापारी१८ हजार ८६
औद्योगिक३ हजार ९५७
पाणीपुरवठा१ हजार ८१४
शेतीपंप३ लाख ४१ हजार ८५९
पथदिप३ हजार ६१४
इतर१ हजार ७७४
जिल्ह्यातील वीजग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत़ शिवाय वीजचोरीही थांबविण्यासाठी महावितरणचे पथक काम करीत आहे़ वीजग्राहकांना महावितरणच्या सेवासुविधा सुरळीत पोहचविण्यासाठी यापुढे काम करणार असून लवकरच थकबाकी वसुलीचा वेग वाढविणार आहोत़
- धनंजय औंढेकर
अधिक्षक अभियंता, सोलापूर जिल्हा़
वीजग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे
जिल्ह्यात वीजग्राहकांकडे महावितरणचे कोट्यावधी रूपयांची वीजबिले थकली आहेत़ ही थकीत वीजबिले भरून वीजग्राहकांनी महावितरणला सहकार्य केले पाहिजे़ जेणेकरून सर्वांना वीजपुरवठा सुरळीत करण्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत़