गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या ताब्यातून पोलिसांनी सुटका केलेल्या पुण्यातील विद्यार्थ्यांनी, त्यांच्या अपहरणाची आपबिती मंगळवारी येथील जिल्हा पोलीस मुख्यालयात सांगितली. नक्षलवाद्यांनी आम्हाला तीन दिवस ओलीस ठेवले. आमची चौकशी केली, मात्र, आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही, असे विकास वाळके, आदर्श पाटील व श्रीकृष्ण शेवाळे यांनी सांगितले. तिघांना बुधवारी त्यांच्या गावी सुखरूप पोहोचविणार आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. गडचिरोलीवरून हेमलकसा व तेथून बिजापूर जिल्ह्याच्या बसागुड्डा जंगल परिसरात आम्हाला नक्षली भेटले. भोजन, निवास आदींची त्यांनी व्यवस्था केली. त्यांची वागणूक सर्वसामान्य नागरिकांसारखी होती, असे या तिघांनी सांगितले. प्रकाशवाटा, सेवाग्राम व इतर सामाजिक कार्याचे पुस्तक वाचून आम्हाला आदिवासी भागातील माणसाचे जीवन जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. आम्ही यापूर्वी आनंदवन, सोमनाथ, सेवाग्राम, हेमलकसा आदी स्थळांना भेटी देऊन माहिती जाणून घेतली. त्यानंतर ‘भारत जोडो’ अभियानांतर्गत महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओडिशात शांतीचा संदेश देण्यासाठी यात्रेचा कार्यक्रम आखला. २३ डिसेंबरला आम्ही हेमलकसा येथे पोहोचलो. त्यानंतर २९ डिसेंबरला बिजापूर परिसरात पोहोचलो. तेथे गणवेशातील एक नक्षल्याने तुम्हाला रस्ता दाखवितो, असे सांगून आम्हाला बाजूला नेले. आम्ही त्यांना आमच्या उपक्रमाची माहिती दिली. (प्रतिनिधी)
नक्षलवाद्यांनी कुठलाही त्रास दिला नाही!
By admin | Updated: January 6, 2016 02:04 IST