गडचिरोली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निषेध म्हणून माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्णात दुर्गम भागातील रस्त्याच्या कामावरील वाहनांची मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली. गुरूवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्णाच्या दुर्गम भागात भितीचे वातावरण पसरले आहे. वर्षभरात जाळपोळीची ही दुसरी घटना आहे.गडचिरोली येथून ५० किमी अंतरावर धानोरा तालुक्यातील पुस्टोला जवळच्या येडमपायली जंगलात नक्षल्यांनी गुरूवारी सायंकाळी ४ वाजता १५ वाहनांना आग लावली. ही सर्व वाहने रस्ता बांधकामाकरिता जंगलात पोहोचविण्यात आली होती. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून या जाळपोळीची अद्याप कुणीही जबाबदारी घेतलेली नसल्याने अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. हैदराबाद येथील सरला कन्स्ट्रक्शन कंपनीला धानोरा तालुक्यातील दुर्गम रस्त्याच्या डांबरीकरणाचे कंत्राट मिळाले आहे. त्याअंतर्गत धानोरा तालुक्यातील पुस्टोलाजवळ असलेल्या येडमपायली-जळेगाव या १४ किमी रस्त्याच्या खडीकरणाचे काम सुरू असताना १५ ते २० माओवादी सायंकाळी ४ वाजता येडमपायली गावाजवळ आले. तेथे त्यांनी दोन जेसीबी, आठ ट्रॅक्टर, एक व्हायब्रेटरी रोलर,दोन ट्रक, बोलेरो जीप आणि एक मोटारसायकल जाळली. रस्त्याच्या खडीकरणापर्यंतचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. महिनाभरापूर्वी रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली होती. मात्र आता माओवाद्यांच्या भीतीमुळे काम बंद पडले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
गडचिरोलीत नक्षल्यांनी १४ वाहने पेटविली!
By admin | Updated: January 24, 2015 01:43 IST