ऑनलाइन लोकमत
गोंदिया, दि. 27 - देवरी तालुक्याच्या गणूटोला एओपीअंतर्गत येणाऱ्या कोसबी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी पेरलेले स्फोटक पोलिसांनी सोमवारी उकरून काढून ६ किलो स्फोटक जप्त केले. यामुळे नक्षलवाद्यांनी आखलेला घातपाताचा डाव उधळून लावण्यात गोंदिया पोलिसांना यश आले.१५ ते १६ नक्षलवादी रविवारी (दि.२५) दुपारी ३ वाजताच्या सुमारास कोसबी जंगल परिसरात वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यात ६ महिला व १० पुरूष नक्षलवादी बंदुक, पिट्टू घेऊन आले होते. डोंगराच्या मध्यवर्ती भागात त्यांनी खड्डा खोदून दोन डब्यात ६ किलो स्फोटक टाकून ते जमिनीत गाडून ठेवले होते. घातपात घडवून आणण्यासाठी नक्षलवाद्यांनी हे स्फोटक पुरून ठेवल्याचे सांगितले जाते. ६ किलो स्फोटक, ३५ फूट लांब वायर, स्फोट घडवून आणण्यासाठी लागणारा क्लोरोमाईन पाईप असे साहित्य पोलिसांनी जब्त केले. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, पोलीस उपअधीक्षक डॉ.संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक अशोक तिवारी, नक्षलविरोधी अभियान पथकाचे रामसिंग उईके, भैय्या कन्नाके, उत्तम नेताम, अश्विन उपाध्याय, पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख, उपनिरीक्षक कुलदीप कदम, गोसावी आणि सी-६० देवरी पथकाच्या जवानांनी केली. १५ नक्षलवाद्यांवर गुन्हा दाखलघातपात करण्यासाठी स्फोटक पेरल्याप्रकरणी पोलिसांनी नक्षलवादी पहाडसिंग उर्फ अशोक उर्फ कुमारसाय मडकाम, रमेश जगदीश सुकलाल टेकाम, विकास उर्फ अनिल नागपुरे, महेश उर्फ विजय, मैनी, रामदास हलामी, रमेश उईके उर्फ विकास मडावी उर्फ आज्ञा उईके, रोशन उर्फ सोमाजी नरोटे, सीमा, प्रमिला उर्फ सुनिता नेताम, नानसू, रिना, नरेश, उर्मिला, पुष्पा व इतर अशा एकूण १५ नक्षलवाद्यांविरूध्द भारतीय हत्यार कायद्याचे कलम ४, ५ अन्वये तसेच सहकलम १३५ मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.