गडचिरोलीतील घटना : पोलीस हवालदार निलंबितगडचिरोली : दोन दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या सीमेवरून अटक करण्यात आलेला एक नक्षलवादी पोलीस मुख्यालयातून फरार झाल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत बंदोबस्त व्यवस्थेवर असणाऱ्या एका पोलीस हवालदाराला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी तातडीने निलंबित केले. रणजीत ऊर्फ चंद्रिका जेठुराम राऊत (४५) रा. घोटसूर ता. एटापल्ली असे फरार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. तर, निलंबित करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव रेनुनाथ भवरे असे आहे.प्राप्त माहितीनुसार धानोरा पोलीस उपविभागांतर्गत छत्तीसगड सीमेलगत फुलबोडी (गट्टा) नजीकच्या जांभळी या गावातून जिल्हा पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदीदरम्यान नक्षल सदस्य रणजीत ऊर्फ चंद्रिका जेठुराम राऊत याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. नक्षल सदस्य रणजीत याला १९९३ मध्ये नक्षल गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाकडून कारावासाची शिक्षा झाली होती. त्यानंतर त्याची पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. मात्र गेल्या १० वर्षांपासून फरार होता. त्याचा सध्या कोणत्याही नक्षल चळवळीशी संबंध नसून तो नक्षल चळवळीत कार्यरत नव्हता, अशी माहिती पोलीस विभागाने दिली आहे. फरार असल्या कारणाने मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला चौकशीकरिता ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशी दरम्यान रणजीत हा पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यामुळे त्याची उलटतपासणी सुरू होती. दरम्यान, रणजीतने भूक लागल्याचे सांगितल्यानंतर गार्ड कमांडर पोलीस हवालदार रेनुनाथ भवरे हे त्याला जेवणाकरिता घेऊन जात होते. अंधाराचा फायदा घेऊन रात्री ९ च्या सुमारास नक्षलवादी रणजीत राऊत हा पोलीस हवालदार भवरे यांना चकमा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.
पोलीस मुख्यालयातून नक्षलवादी फरार
By admin | Updated: December 3, 2014 00:35 IST