पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय केंद्राच्या संचालकांची नवी कोरी चारचाकी गाडी शनिवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी फोडल्याचा प्रकार समोर आला. या घटनेमुळे विद्यापीठातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच या घटनेकडे विविध अंगांनी पाहिले जात आहे.विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे यांनी काही दिवसांपूर्वी नवी चारचाकी गाडी विकत घेतली. विद्यापीठ परिसरातील शिक्षकांच्या वसाहतीसमोर ही गाडी रात्री वाहनतळावर उभी केली. मात्र, सकाळी या गाडीची काच फोडल्याचे दिसून आले. याबाबत खरे यांचा मुलगा अभिषेक याने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. खरे यांच्याशी वैचारिक मतभेद असलेल्या किंवा वैयक्तिक वाद असणाऱ्या व्यक्तींनी हे कृत्य केले असावे, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात केली जात आहे.विजय खरे म्हणाले, ‘‘मी नवीन चारचाकी गाडी घरी आणली. शनिवारी रात्री अकरा वाजेपर्यंत मी माझ्या मित्रपरिवाराबरोबर गाडीजवळ गप्पा मारल्या. त्यानंतर आम्ही घरी गेलो. मात्र, सकाळी गाडीची काच फोडल्याचे दिसून आले. मला काही कामानिमित्त पुण्याबाहेर जावे लागल्याने माझ्या मुलाने पोलिसांकडे तक्रार दिली.’’विद्यापीठातील कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनील धिवार म्हणाले, ‘‘आंबेडकरी विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येच्या निषेधार्थ डॉ. विजय खरे यांच्यासह आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात निषेधसभा घेतली होती. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी खरे यांची नवी कोरी गाडी फोडल्याची घटना घडली. त्यामुळे याकडे केवळ कुणाचा खोडसाळपणा म्हणून पाहता येणार नाही. वैचारिक वादातून हा प्रकार झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.’’
विद्यापीठात फोडली नवी कोरी चारचाकी
By admin | Updated: March 6, 2017 02:15 IST