शिरवळ : लग्न म्हटले की खर्च तर होणारच; पण आताच्या जमान्यात लग्न ही प्रतिष्ठेची बाब बनली आहे. अवाढव्य खर्च करून धूमधडाक्यात विवाहसोहळा करण्याकडे कल वाढला आहे. यामध्ये शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी करण्याबरोबरच हजारो रुपयांची सुपारी देऊन ‘डॉल्बी’ वाजविली जाते. ‘आवाजी लग्न’ ही संकल्पना रुजतेय की काय, अशी भीती निर्माण होत असतानाच ‘लोकमत’नं ‘डॉल्बी’च्या दुष्परिणामांबाबत जनजागृती सुरू केल्यामुळे समाजविघातक परंपरेला आळा बसू लागला आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे जवळे, ता. खंडाळा येथे होणाऱ्या लग्नात चक्क नवरदेवानेच आपल्या लग्नात ‘डॉल्बी’ न वाजविण्याची भूमिका घेतली आहे.जवळे, ता. खंडाळा येथील उपसरपंच अजय भोसले यांचा विवाहसोहळा आहे. एका मंगल कार्यालयात हा विवाह सोहळा होणार आहे. मोठ्या धूमधडाक्यात लग्न करायचे, असा त्यांच्या मित्रांचा अट्टहास होता. लग्नसमारंभात ‘डॉल्बी’ वाजलीच पाहिजे, असा हेका मित्रांनी भोसले यांच्याकडे धरला होता. मात्र, लग्नपत्रिका वाटत असताना भोसले यांनी ‘लोकमत’मधील बातमी वाचली अन् त्याक्षणी आपल्या लग्नात डॉल्बी वाजवायची नाही, असा निर्णय घेतला. भोलसे यांनी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या लोकचळवळीचे कौतुक करण्याबरोबरच त्यात खारीचा वाटाही उचलला आहे.‘लोकमत’ने सामाजिक जाणिवेतून सुरू केलेल्या लोकचळवळीला विविध स्तरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. जवळे येथील उपसरपंच भोसले यांनी या चळवळीला प्रतिसाद देत ‘डॉल्बी’बंदीचा निर्णय घेऊन प्रथम आपल्या लग्नापासून त्याची अंमलबजावणी करत डॉल्बीमुक्तीचा नारा दिला आहे.(प्रतिनिधी)‘लोकमत’मुळे ‘डॉल्बीच्या दुष्परिणामांची जाणीव झाली. ‘डॉल्बी’मुळे ध्ननिप्रदूषणाबरोबरच आरोग्यावरही त्याचा दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे या शुभकार्याची सुरुवात प्रथम आपल्यापासून करणार असून माझ्या लग्नात ‘डॉल्बी’ वाजविणार नाही. सरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थांच्या सहाकार्याने जवळे गावही डॉल्बीमुक्त व्हावे, यासाठी प्रयत्न करणार आहे.- अजय भोसले, उपसरपंच, जवळे‘डॉल्बी’बंदीची सुरुवात स्वत:च्या लग्नापासून उपसरपंच अजय भोसले यांनी स्वत:च्या लग्नासाठी मित्रांच्या आग्रहाखातर डॉल्बी ठरविली होती. ते आपल्या लग्नाच्या निमंत्रणपत्रिका वाटत असताना ‘लोकमत’मधील वृत्त त्यांनी वाचले आणि ‘डॉल्बी’मुळे किती विपरीत परिणाम होतात याची जाणीव त्यांना झाली. बातमी वाचल्यानंतर त्यांनी आपल्या लग्नात डॉल्बी न वाजविण्याचा निर्णय घेतला. तसेच आपल्या मित्रांनाही याबाबत समजावून सांगितले. त्यामुळे भोसले यांच्या या निर्णयाला त्यांच्या मित्रांनीही पाठिंबा दर्शविला आहे.
लग्नात ‘डॉल्बी’ वाजविण्यास नवरदेवाचा नकार
By admin | Updated: June 8, 2015 00:51 IST