ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेसाठी विधानसभेत जेव्हा बहुमत सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस तटस्थ राहील असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले.
महाराष्ट्रात भाजपाचे सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीने एकतर्फी समर्थन का दिले असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता आपण भाजपाला समर्थन देत नाही वा विरोधही करत नाही असे त्यांनी सांगितले. सभागृहात बहुमतासाठी मतदान झाल्यासा आम्ही त्यात सहभागी होणार नाही. जर असे केले नाही तर सहा महिन्यांत राज्यात पुन्हा निवडणूक होईल. हे टाळण्यासाठी व स्थिर सरकार राज्यात यावे यासाठी आपण हे पाऊल उचलत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या नेत्यांनी केलेल्या घोटाळ्यांची चौकशी होऊ नये यासाठी राष्ट्रवादी भाजपाला बाहेरून पाठिंबा देत आहे या पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानाचा शरद पवारांनी चांगलाच समाचार गेतला. हा प्रश्न विचारणारे चव्हाण तीन वर्ष मुख्यमंत्री होते, तेव्हा ते काय करत होते, झोपले होते का? असा सवालही त्यांनी केला.