नाशिक : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी राष्ट्रवादीचे शिवाजी चुंबळे, भाजपाचे प्रा. कुणाल वाघ, सेना-रिपाइंकडून ललिता भालेराव आणि कॉँग्रेसचे राहुल दिवे या चौघांनी अर्ज दाखल केले आहेत. सत्ताधारी मनसेने उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने स्थायी समितीच्या चाव्या आता राष्ट्रवादीच्या हाती जाणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यावरून कॉँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. येत्या २४ मार्चला सभापतिपदासाठी निवडणूक होणार असून, सेना-भाजपानेही मनसे-राष्ट्रवादीला शह देण्याची तयारी चालविली आहे. स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसे व राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी दावेदारी केली जात होती; परंतु उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी केवळ राष्ट्रवादीचे शिवाजी चुंबळे यांनीच अर्ज दाखल केल्याने मनसेने राष्ट्रवादीला पाठींबा दिल्याचे स्पष्ट झाले. मनसेकडून संगीता गायकवाड व अनिल मटाले यांची नावे चर्चेत होती, परंतु मनसेने अर्ज दाखल केला नाही. मनसेचे पदाधिकाऱ्यांचे मोबाईलही ‘नॉट रिचेबल’ होते. (प्रतिनिधी)
नाशिक महापालिकेची ‘स्थायी’ राष्ट्रवादीकडे!
By admin | Updated: March 21, 2015 01:22 IST