ऑनलाइन लोकमतपरभणी, दि. ५ - इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या कारणावरुन अटक केलेल्या परभणीतील नासेरबीन चाऊस व शाहीद खान या दोघांना सोबत आणून एटीएसने त्यांच्या घरांची शुक्रवारी झडती घेतली. या झडतीमध्ये काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे पथकाच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
दहशतवाद विरोधी पथकाने परभणी येथून १३ जुलै रोजी नासेरबीन चाऊस याला तर २३ जुलै रोजी शाहीद खान याला इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन अटक केली होती. सध्या हे दोन्ही आरोपी एटीएसच्या औरंगाबाद येथील पोलीस कोठडीत आहेत. एटीएसचे औरंगाबाद, नांदेड व नागपूर येथील आठ अधिकाऱ्यांचे पथक शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नासेरबीन चाऊस व शाहीद खान या दोघांनाही सोबत घेऊन त्यांच्या गाडीवान मोहल्ला व काद्राबाद प्लॉट परिसरातील घरी दाखल झाले.
या दोन्ही आरोपींच्या घरांची इन कॅमेरा व पंचासमक्ष झडती घेण्यात आली. यावेळी दोन्ही आरोपींचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी काही महत्वपूर्ण कागदपत्रे पथकाच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. याबाबत एटीएसच्या अधिकाऱ्यांशी मोबाईवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दोन्ही आरोपीच्या घरातून काय कागदपत्रे मिळाली, याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही.