प्राची सोनवणे,
नवी मुंबई-महापालिकेने मान्सूनपूर्वीच्या नालेसफाईच्या कामाला गती दिली आहे. या कामासाठी २५ मेची डेडलाइन देण्यात आल्याने शहरात एकाच वेळी विविध भागात या कामाचा धडाका सुरू करण्यात आला आहे. असे असले अनेक ठिकाणी नालेसफाईचा केवळ दिखावा केला जात आहे. तसेच काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नसल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे पावसाळी पाण्याचे ठोस व्यवस्थापन असणे आवश्यक आहे. त्यानुसार नालेसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मुख्य नाल्यांसह पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या वसाहतीअंतर्गतच्या नालेसफाईवर भर देण्यात आला आहे. गेल्या चार दिवसांपासून हे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला गाळ व मातीचे ढीग दिसून येत आहेत.सुरक्षाविषयक साहित्याचा अभाव: नालेसफाई करणाऱ्या कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने साहित्य पुरविण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांना हाताने व उघड्या पायाने गाळ उपसण्याचे काम करावे लागते. या कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना राबविली जात नाही. विशेष म्हणजे कोणत्या विभागात किती कंत्राटदार नेमले आहेत. त्याची साधी नोंदही महापालिकेकडे नसल्याचे दिसून आले आहे. ५५0 किमी लांबीचे छोटे नाले: नवी मुंबई महानगरपालिका शहरातील पावसाळी पाण्याच्या गटाराचे जाळे सुमारे ५५० किमी लांबीचे आहेत. महापालिका क्षेत्रात पावसाळी पाणी एकत्रित करून खाडी भागात विसर्जित करण्याकरिता १० मुख्य नाले अस्तित्वात आहे. एकूण ७४ हजार २८२ मीटर लांबीच्या या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून तो उपसण्याचे काम सुरु आहे. बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा, एमआयडीसी अशा नऊ विभागांतील नालेसफाई करण्याचे आवाहन प्रशासनासमोर आहे.होल्डिंग पॉण्ड धोकादायक: पावसाचे पाणी साठवून त्याचा निचरा करण्यासाठी शहरात ११ होल्डिंग पॉण्डची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून या पॉण्डची साफसफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यातील गाळाची पातळी वाढून पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली आहे. पर्यावरण अहवालानुसार या पॉण्डची पाणी साठवण्याची क्षमता ८0 टक्क्यांनी कमी झाली आहे. एकूणच हे होल्डिंग पॉण्ड धोकादायक स्थितीत आले आहेत. >बालकामगारही जुंपलेशहरात ठिकठिकाणी गटार तसेच नाल्यांची स्वच्छता सुरु असून यामध्ये बालकामगारही गटारांमध्ये उतरून गाळ काढत असल्याचे चित्र पहायला मिळते. नियमानुसार नालेसफाई करणाऱ्या कामगारांच्या हातात मोजे तसेच पायात गमबूट असणे आवश्यक आहे. परंतु हे साहित्य कामगारांपर्यंत पोहोचलेच नसल्याने कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. साचलेला गाळ हाताने काढावा लागत असल्याने या कामगारांमध्ये रोगराईचे प्रमाण वाढत आहे.