वनसंपदेचा खजिना : विदर्भात वाशिम वगळता १० जिल्ह्यांत वाघांचे अस्तित्वगणेश वासनिक - अमरावतीविदर्भात नागपूर ‘टायगर कॅपिटल’चे शहर बनविण्याची दोन वर्षांपूर्वीची राज्य शासनाने केलेली घोषणा हवेत विरली आहे. येथे वनसंपदेचा खजिना असताना राज्यकर्त्यांच्या अनास्थेमुळे ही स्थिती निर्माण झाली असून विदर्भात पर्यटनाला वाव मिळण्याचे मार्ग बंद करण्यात आल्याचे चित्र आहे.तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन वर्षांपूर्वी नागपूर येथे एका कार्यक्रमात नागपूर ‘टायगर कॅपिटल सिटी’ बनविण्याची घोषणा केली होती. ही मागणी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, खा. राजेंद्र दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांकडे विशेष करुन केली होती. या मागणीच्या अनुषंगाने पृथ्वाराज चव्हाण यांनी वन विभागाला ‘टायगर कॅपिटल सिटी’चा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशदेखील दिले होते. मात्र मुख्यमंत्री परतताच नागपूर टायगर कॅपिटल सिटीचा प्रस्ताव वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी शासनाकडे उशिरा पाठविला. परिणामी शासनाला याबाबत वेळेवर निर्णय घेता आला नाही. त्यानंतर राज्यातील शासन बदलले. परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विदर्भातील आहेत. या दोघांनाही विदर्भातील प्रश्न आणि समस्यांची खडान्खडा माहिती आहे. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री फडणवीस हे नागपूरचे आमदार असताना त्यांनी टायगर कॅपिटल सिटी निर्मितीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या नागपूर टायगर कॅपिटल सिटीचे स्वप्न साकारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी विदर्भवासीयांची आहे. राज्यात एकूण २१ टक्के जंगल असून त्यापैकी १७ ते १८ टक्के जंगल एकट्या विदर्भात आहेत. नागपूर शहराला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. पेंच, ताडोबा, नागझिरा, बोर व मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या जवळपास ३०० आहे. तसेच विदर्भात ३० ते ३५ अभयारण्य असून येथेही वाघ असल्याची नोंद आहे. नागपूरला टायगर कॅपिटल सिटीचा दर्जा मिळाल्यास येथे पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव मिळेल, त्यानुषंगानेच लोकप्रतिनिधींनी मागणी रेटून धरली आहे. टायगर कॅपिटल सिटी निर्मितीसाठी कृती आराखडा तयार करण्यात आला होता. वाघांचे अस्तित्व दाखविणारे भले मोठे प्रवेशद्वार, पर्यटनाचे केंद्र आदी बाबी यात अंतर्भूत करण्यात आल्या होत्या. मात्र शासनाने नागपूर टायगर कॅपिटल सिटी निर्मितीसाठी जोरकसपणे प्रयत्न केले नसल्यामुळे हा प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात पडला आहे. विदर्भात नागपूर हे शहर महत्त्वाच्या स्थळी असल्यामुळे येथे आंतराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ, मिहान प्रकल्प, उद्योगधंदे, पर्यटनवाढीस चालना देणाऱ्या सोईसुविधा असल्याने टायगर कॅपिटल सिटी निर्माण झाल्यास वाघांचे संरक्षण, संगोपन करणे सुकर होईल.
नागपूर ‘टायगर कॅपिटल सिटी’चे स्वप्न हवेत विरले
By admin | Updated: November 30, 2014 00:54 IST