मुंबई : अहमदनगर-बीड-परळी या गेली २० वर्षे रखडलेल्या रेल्वेमार्गाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना दिले.वेगवेगळ्या राज्यांतील रखडलेल्या प्रकल्पांबाबत पंतप्रधान मोदी राज्यांच्या मुख्य सचिवांशी संवाद साधतात. अहमदनगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाबाबत राज्य सरकारची भूमिका जाणून घेण्याकरिता मोदी यांनी क्षत्रिय यांच्याशी संपर्क केला. १९९५ साली जेव्हा या मार्गाचा प्रस्ताव सर्वप्रथम मांडला गेला तेव्हा या प्रकल्पाचा खर्च ५१४ कोटी रुपये होता. निधीच्या कमतरतेमुळे प्रकल्प रखडला व खर्च वाढला. २००९ मध्ये राज्य सरकारने या प्रकल्पाचा ५० टक्के खर्च उचलण्याची तयारी दाखवली. आजमितीस या प्रकल्पाचा खर्च २८८० कोटी रुपयांच्या घरात गेला आहे ़ ही बाब रेल्वे मंत्रालयाने बुधवारी सकाळीच राज्य सरकारला कळवली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५० टक्के खर्च उचलण्याचे मान्य केले.क्षत्रिय यांनी पंतप्रधानांना आश्वस्त केले की, राज्य मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत या रेल्वे प्रकल्पाचा ५० टक्के खर्च राज्य सरकार उचलण्याचा निर्णय मंजूर केला जाईल. या प्रकल्पाकरिता १६०० हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. आतापर्यंत राज्य सरकारने १३०० हेक्टर जमीन संपादित केली आहे. उर्वरित ३०० हेक्टर जमिनीचे संपादन डिसेंबर २०१५ पर्यंत केले जाईल, असेही क्षत्रिय यांनी पंतप्रधानांकडे स्पष्ट केले. अहमदनगर-बीड या १६० कि.मी. रेल्वेमार्गाचे काम २०१९ पर्यंत व बीड-परळी या रेल्वेमार्गाचे काम त्यापुढील दोन वर्षांत केले जाईल, असे क्षत्रिय यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)
नगर-बीड-परळी ६ वर्षांत पूर्ण करणार
By admin | Updated: May 28, 2015 01:23 IST