पातूर/ शिर्ला (जि. अकोला) : एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह मंगळवारी पहाटे आस्टुल परिसरातील शेतात आढळून आले. तीन मुलांची हत्या करूण आई-वडिलांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे़ संजय पूर्णाजी इंगळे (४५), त्यांची पत्नी मनिषा (३५), ऐश्वर्या (१९), मयुरी (१७) रोशन (१५) अशी मृतांची नावे आहेत़ आस्टुल परिसरातील इंगळे याच्या शेतात तिघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत तर दोन मुलींचे मृतदेह शेतात इतर ठिकाणी आढळून आले. इयत्ता नववीत शिकणाऱ्या रोशनचा मृतदेह फांदीला लटकलेला होता. मयुरीचा ओढणीने गळा आवळलेल्या स्थितीत, तर ऐश्वर्याचा गळा दाबून तिला ठार केल्याचे दिसून आले. आंब्याच्या दुसऱ्या झाडाला पती-पत्नीचे मृतदेह लटकलेले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. संजय इंगळे यांची वडिलोपार्जित ३५ एकर बागायती शेती आहे. गावकऱ्यांच्या माहितीनुसार इंगळे कुटुंबातील सदस्य पिकांना पाणी देण्यासाठी दररोज शेतात जात होते. मंगळवारी पहाटे ४ च्या सुमारास त्यांना मोटारसायकलने शेताकडे जाताना काही गावकऱ्यांनी बघितले. नेहमीच शेतात जात असल्याने कुणालाही शंका आली नाही. काही वेळानंतर गावातील एक मुलगा परिसरात गेला असता त्याला या पाचजणांचे मृतदेह आढळून आले. पातूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले़ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. संपत्तीच्या वादातून ही घटना घडल्याचा संशय असून, त्या दिशेने तपास सुरू केल्याचे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिणा यांनी सांगितले. (लोकमत चमू)
एकाच कुटुंबातील पाच जणांचा गूढ मृत्यू!
By admin | Updated: April 22, 2015 04:00 IST