ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 12 - संपत्तीचे वाद हे कुटुंबासाठी काही नव्हे नाहीत. अनेकांची नाती संपत्तीच्या कारणास्तवच तुटली आहेत. संपत्तीमुळे भाव भावापासून दुरावल्याच्या अनेक घटना आजतागायत घडल्या आहेत. संपत्तीच्या वादातून अनेकांनी एकमेकांच्या हत्याही केल्या आहेत. नाशिकमध्येही संपत्तीच्या वादातून अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक रोड परिसरात डोक्यात दगड घालून संतोष पाटील यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या हत्येचा छडा लावला आहे. संतोषच्या हत्येमागे त्याची सख्खी बहीण आणि आई असल्याचं समजल्यानंतर पोलिसांना धक्काच बसला. संतोषच्या हत्येचा कट त्याच्या आई आणि बहिणीनं मिळून रचला होता. संपत्तीच्या वादातून मायलेकींनी चक्क स्वतःच्या भावाचा काटा काढला. मावस भावाच्या मदतीनं संतोषला मारण्यासाठी दोघांना 40 हजार रुपयांची सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणात हत्येचा कटात आई आणि बहिणीचा समावेश असल्याचं चौकशीतून समोर आलं. विशेष म्हणजे बहिणीनेच आईला फूस लावल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या प्रकरणात नाशिक रोड पोलिसांनी 3 आरोपींना जेल रोड परिसरातून अटक केली आहे. 7 मार्चला रात्री संतोष पाटील याची डोक्यात दगड घालून निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. तत्पूर्वी त्याचा गळाही आवळण्यात आल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. मायलेकींनी नात्याला काळिमा फासणारा हा प्रकार घडवून आणल्यानंतर सर्वच स्तरातून याची निंदा केली जात आहे.
संपत्तीसाठी मायलेकींनी काढला भावाचा काटा
By admin | Updated: March 12, 2017 08:49 IST