वसई : नवघर-माणिकपूर शहरातील एका रहिवाशी सोसायटीने मुस्लीमांना फ्लॅट विकू नका असा आदेश एका फ्लॅटधारक महिलेला दिला आहे. इतकेच नाही तर तातडीची सभा घेऊन मुस्लिमांना फ्लॅट न विकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वसईत एका नव वादाला तोंड फुटले आहे.वसईत राहणाऱ्या विकार खान यांनी साई नगर परिसरातील हैप्पी जीवन या इमारतीतील कांताबेन नटवरलाल पटेल यांच्याकडून एक फ्लॅट विकत घेतला आहे. त्यासाठी त्यांनी पैसे देखील जमवायला सुरुवात केली आहे. मात्र आता या सोसायटीच्या काही पदाधिकाऱ्यांनी यावर हरकत घेतली आहे. सोसायटीने ४ सप्टेंबरला तातडीची बैठक बोलावून फ्लॅट मुस्लीम व्यक्तींना न विकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कांताबेनसह इतर सर्व सदस्यांना लेखी पत्र पाठवले आहे. त्यात मुस्लीम व्यकतींना फ्लॅट न विकण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे आपण आपला फ्लॅट मुस्लीम व्यक्तीला विकू नका. त्यामुळे सोसायटीतील वातावरण कलुषित होण्याचा धोका आहे, असे म्हटले आहे. या विरोधात माणिकपूर पोलिसांकडे तक्रार करायला गेल्यावर पोलिसांनी साधी तक्रार देखील लिहून घेतली नाही , असे विकार खान यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मुस्लिमांना फ्लॅट विकू नका!
By admin | Updated: September 18, 2016 02:12 IST