- आप्पासाहेब पाटील
सोलापूर, दि. 19 - स्थळ पार्क चौक... दुपारी तीनची वेळ...एकामागून एक रिक्षा पार्क चौकातील हुतात्मा पुतळयाजवळ जमू लागल्या. हातात तिरंगा झेंडा घेऊन आलेल्या मुस्लिम युवकांनी इंडियन आर्मी जिंदाबाद...पाकिस्तान मुर्दाबाद...पाकिस्तान मुर्दाबाद...पाकिस्तान मुर्दाबाद... असे एकामागून एक घोषणा देत शहरातील मुस्लिम युवक रस्त्यावर उतरले अन इंडियन आर्मीचा जयघोष करत शहरात अनोख्या पध्दतीने इंडियन आर्मी डे साजरा करून या मुस्लिम तरूणांनी भारताविषयीचे प्रेम व्यक्त केले.
मंगळवार १९ जुलै रोजी पाकिस्तानमध्ये इंडियन आर्मीच्या विरोधात ब्लॅक डे साजरा करण्यात आला त्याचा निषेध म्हणून शाब्दी ग्रुपच्यावतीने इंडियन आर्मी दिवस साजरा करण्यात आला. तसेच, शहरातील काही सामाजिक संघटनांचे मुस्लिम युवक एकत्रितपणे येऊन त्यांनी आर्मी डे साजरा केला.
सुरुवाकीला पार्क चौकातील हुतात्मांना पुष्पहार अर्पण करून इंडियन आर्मी जिंदाबाद... पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या़. तसेच, आपल्या देशाच्या जवानांचा निषेध करणाऱ्या पाकिस्थानचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.
इंडियन आर्मीतील सर्व जवान आपल्या जीव पणाला लावून देशाची सुरक्षा करतात. या जवानांमुळेच संपूर्ण देशातील नागरिक आज सुरक्षित आहेत. त्यामुळेच इंडियन आर्मी भारताचे कवच आहे, असे मत शाब्दी सोशल ग्रुपचे अध्यक्ष रसूल पठाण यांनी केले.
यावेळी इम्रान मंगलगिरी, सादीक नदाफ, समीर मुजावर, मुस्ताक पठाण, इरफान मंगलगिरी, अझहर शेख, शाहरूख शेख, नुरअहमद शेख, सज्जाद मुल्ला, जहीर पठाण, वसीम पठाण, आर.एन.पठाण, नज्जो शेख, आझम शेख यांच्यासह आदी शाब्दी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.