तळा : मुरुड - मांदाड मार्गे - तळा - माणगांव ही एसटी फेरी सुरु करण्याबाबत गेले वर्षभर मागणी करुनही मुरुड आगार प्रमुख टाळाटाळ करीत असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे. रायगड जिल्ह्यातील मांदाड खाडीवर जवळपास १३ ते १४ कोटी रु. खर्च करुन १० वर्षांपूर्वी पुलासाठी निधी उपलब्ध करुन पुलाचे काम पूर्ण झाले. गेल्या १० वर्षात या पुलावरुन एकही एसटी वाहतूक सुुरु नाही. मुरुड हे पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत आहे. जवळच श्रीवर्धन - दिवेआगर यासारखी पर्यटन केंद्रे आहेत आणि आता दिघी पोर्ट अस्तित्वात येत आहे. अशावेळी दळणवळणासाठी एसटी वाहतूक सुरु होणे गरजेचे आहे. या पुलावरील वाहतुकीमुळे श्रीवर्धन - म्हसळा - तळा - माणगांव - महाड इत्यादी तालुके मुरुड या पर्यटन केंद्राला जवळ येणार आहेत. अशा वेळी आर्थिक उलाढालही विकसित होणार आहे. गेले वर्षभर मुरुड आगार प्रमुख मोगरे यांच्याशी पत्रव्यवहार, फोनवर मुरुड - मांदाड मार्गे - तळा ही फेरी सुरु करण्याबाबत चर्चा केली असता ते लवकरच सुरु करतो. विभागीय कार्यालय पेणकडे पत्रव्यवहार सुरु आहे. तेथून परवानगी आली की लगेच सुरु करतो, अशी उत्तरे आगारप्रमुखांकडून प्रवाशांना देण्यात येतात. परंतु वर्ष होत आले तरी मुरुड - तळा फेरी सुरु झालेला नाही. तरी मुरुड आगार प्रमुखांनी लवकरच मुरुड - तळा ही फेरी सुरु करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
मुरुड - तळा एसटी सुरु करण्यास टाळाटाळ
By admin | Updated: April 30, 2016 02:54 IST