मुंबई : बोरीवलीच्या काजूपाडा परिसरात महिलेने महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. मृत महिला चार महिन्यांची गरोदर होती. हत्येनंतर आरोपी महिलेने तिचा मृतदेह सोफ्यात दडवून ठेवला आणि भलताच बनाव रचला. मात्र पोलिसांच्या चौकशीदरम्यान उलटसुलट जबाबांमुळे तिचे खरे रूप समोर आले. पोलिसांनी तिला अटक केली.उज्ज्वला वीर (२२) असे तिचे नाव आहे. तर प्रीती भागेकर (२६) असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव आहे. प्रीतीचा नवरा प्रशांत याने उज्ज्वलाला २० हजार उसने दिले होते. ते परत करण्यावरून प्रीतीने उज्ज्वलाच्या मागे तगादा लावला. त्यावरून दोघांमध्ये वाद होते. त्यातच प्रशांतची उज्ज्वलासोबतची जवळीकही प्रीतीला अस्वस्थ करीत होती. तिला या दोघांमध्ये विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास दोघींची परिसरातच भेट घडली. दोघी उज्ज्वलाच्या घरी गेल्या. तेथे त्यांच्यात वाद झाला. संधी साधत उज्ज्वलाने प्रीतीचा दोरीने गळा आवळला. त्यानंतर गळ्यावर ब्लेडने वार करून डोक्यात अवजड वस्तूने प्रहार केला. यात गंभीर जखमी झालेल्या प्रीतीचा मृत्यू झाला. हा प्रकार घडला तेव्हा उज्ज्वलाची अर्धांगवायू झालेली आई घरीच होती. हत्येनंतर उज्ज्वलाची बहीण आणि मोलकरीण घरी आले. उज्ज्वलाने त्यांना कोणताही संशय येऊ दिला नाही. थोड्या वेळाने उज्ज्वला प्रीतीच्या घरी गेली. तेथे अज्ञात व्यक्ती घरात शिरले. त्यांनी प्रीती व माझ्यावर हल्ला चढविला, अशी थाप प्रशांतकडे मारली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनाही उज्ज्वलाने हेच सांगितले. मात्र पोलिसांनी कसून चौकशी करताच सारे उघड झाले.
बोरीवलीत गर्भवतीची महिलेकडून हत्या
By admin | Updated: February 14, 2015 04:04 IST