मुंबई : वेल्डिंग करताना तीन कर्मचारी गंभीररीत्या भाजल्याची घटना रविवारी कुर्ला कारशेडमध्ये घडली. वेल्डिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरच्या पायपावर ठिणगी पडून त्यातून गॅस बाहेर पडला. त्याचा स्फोट होऊन आॅइलच्या टाकीने पेट घेतला. त्यामुळे ही दुर्घटना घडली. भाजलेल्या दत्तात्रय बडग व हरिश्चंद्र या दोघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उदयभान हे ९० टक्के भाजले असून, त्यांना ऐरोली येथील बर्न रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. कुर्ला कारशेडमध्ये दुपारी १२.४०च्या सुमारास हे तीन कर्मचारी लोखंड कापण्याचे काम करीत होते. त्या वेळी अचानक सिलिंडरच्या पायपावर ठिणगी पडली आणि पाईप फुटून मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर आला. आग लागली. जवळच आॅइलची छोटी टाकी असल्याने तिनेही पेट घेतला. त्यामुळे काम करणारे हे तिघेही भाजले. ही घटना घडताच कारशेडमधील अन्य कर्मचाऱ्यांनी त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. त्यांना उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात पाठवण्यात आले. (प्रतिनिधी)
कुर्ला कारशेडमध्ये स्फोट
By admin | Updated: December 1, 2014 02:18 IST