डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीलगतच्या २७ गावांचा राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार पालिकेत समावेश करण्यात आला असला तरी ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे या गावांचा ताबा महापालिका प्रशासनाला मिळालेला नाही. मात्र, या २७ गावांच्या समितीत आता फूट पडली असून ५ गावांनी महापालिकेत समाविष्ट होण्याची तयारी दर्शविल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मंगळवारी पालिका अधिकाऱ्यांनी त्या ग्रामपंचायतींचा ताबा घेतला. अद्याप २२ गावे महापालिकेत सहभागी होण्यास तयार नाहीत. या गावांतील ग्रामस्थांनी ग्रामसभेत याबाबतचा ठराव मंजूर करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. उसरघर, नांदिवली-अंबरनाथ, नांदिवली-पंचानंद, भोपर आणि सागाव-सागर्ली या ५ ग्रामपंचायतींनी विरोधाचा कोणताही ठराव केला नसल्यामुळे या गावांची महापालिकेत सहभागी होण्याची तयारी असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाला कळविले. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांना या गावांतील स्थावर आणि जंगम मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले असून लेखा विभाग, पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभागातील कागदपत्रे ताब्यात घेण्यासाठी कनिष्ठ अभियंत्यांना पाठविण्यात आले असून बुधवार-गुरुवारी ही कामे पूर्ण होतील, असेही सांगण्यात आले.
त्या गावांसाठी पालिकेचा प्रयत्न
By admin | Updated: June 4, 2015 04:21 IST