मुंबई : ठाणे येथे फुटलेल्या तानसा मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम वेगाने हाती घेण्यात आल्यानंतर रविवारी रात्री १० वाजेपर्यंत हे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. सोमवार, सकाळपासून मुंबई शहराला करण्यात येणारा पाणीपुरवठा सुरळीत सुरु होईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली. मुंबई शहर आणि उपनगराला पाणीपुरवठा करणारी तानसा मुख्य जलवाहिनी ठाणे येथील किसन नगर भागात शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास फुटली होती. ७२ इंच व्यासाची ही जलवाहिनी फुटल्याने येथील तब्बल ७०० घरांमध्ये पाणी शिरले. शिवाय १५ घरे पूर्णत: उद्ध्वस्त झाली. दुर्देव म्हणजे यात १८ जण जखमी झाले तर १५ हजार नागरिकांना याचा फटका बसला. तत्पूर्वी जलवाहिनीचे व्हॉल्व्ह बंद करून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. शिवाय मुंबईत २० टक्के पाणीकपातही तातडीने लागू करण्यात आली.महापालिकेच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत दुरुस्तीचे काम हाती घेतले, तरी तोवर लाखो लिटर पाणी वाया गेले. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आल्याने रविवारी दुपारी ४.३० वाजेपर्यंत हे काम सुमारे ५० टक्के पूर्ण झाले होते. रात्री १० वाजेच्या सुमारास हे काम पूर्णपणे आटोक्यात आले. आता सोमवारी सकाळपासून मुंबईकरांना सुरळीतपणे पाणीपुरवठा सुरु होईल. परंतु पाण्याचा दाब कमी राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीत होणार
By admin | Updated: March 30, 2015 02:51 IST