मुंबई : मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाने दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना धान्यदान करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यशास्त्र विभागासोबतच मानसशास्त्र विभागही शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे. या उपक्रमात नागरिकांना १ किलो तांदूळ आणि १ किलो डाळ किंवा धान्यस्वरूप वस्तू दान करता येणार आहेत. त्यासाठी विद्यापीठाने रजनी फाउंडेशन या संस्थेची मदत घेतली आहे. ज्या नागरिकांना किंवा विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या या उपक्रमात सामील व्हायचे असेल, त्यांनी ४ आॅक्टोबर २०१५पर्यंत मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागामध्ये धान्य जमा करण्याचे आवाहन उपकुलसचिव लीलाधर बनसोड यांनी केले आहे. त्यानंतर राज्यशास्त्र विभागातील १२ जणांची तुकडी आणि २ प्राध्यापक दुष्काळग्रस्त भागास भेट देणार आहेत. (प्रतिनिधी)
दुष्काळग्रस्तांच्या मदतीला मुंबई विद्यापीठ
By admin | Updated: October 2, 2015 04:04 IST