नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्र्यांची यादी तयार केल्याचे समजते. मुंबई शहर, ठाणे, परभणी, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे तर मुंबई उपनगर, रायगड, पुणे, जळगाव व नाशिक या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद भाजपाकडे सोपवण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे समजते. येत्या दोन दिवसांत पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.पालकमंत्रीपदावरून भाजपा-शिवसेनेत तसेच दोन्ही पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू होती. मुंबई उपनगरचे पालकमंत्रीपद शिवसेनेला सुभाष देसाई यांच्याकरिता हवे होते. मात्र त्याला भाजपाचा विरोध होता. अखेरीस शिवसेनेला मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आल्याचे कळते. शिवसेनेचा मुंबई उपनगर जिल्ह्यावरील दावा कमकुवत करण्याकरिता ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर भाजपा दावा करणार होते. त्यामुळे शिवसेनेत नाराजी होती.शिवसेनेला विदर्भातील यवतमाळ व अन्य काही जिल्ह्यांची पालकमंत्रीपदे हवी आहेत. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्री यादी अंतिम करणार असल्याचे कळते. शिवसेनेत रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद रामदास कदम यांना मिळू नये याकरिता केंद्रीय मंत्री अनंत गिते व उद्योगमंत्री सुभाष देसाई हे प्रयत्नशील असल्याची चर्चा होती. काही मंत्र्यांना सध्या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद दिले जाणार असून भविष्यात मंत्र्यांची संख्या वाढल्यावर त्यांना त्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद दिले जाईल, असे सांगण्यात येत आहे. (विशेष प्रतिनिधी)
मुंबई शहर, ठाण्याचे पालकमंंत्रीपद सेनेकडे!
By admin | Updated: December 25, 2014 01:59 IST