पुणे : गरीब मुलाला अन्न न देता त्याला अमानुषपणे दुकानाबाहेर काढल्यामुळे शनिवारी दुपारी एका दलित संघटनेच्या दहा ते बारा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत रेस्टॉरंटवर चिखल आणि शेण फेकून निषेध व्यक्त केला. दोन महिन्यांमधील अशाप्रकारची ही दुसरी घटना आहे.एमआयटी महाविद्यालयाच्या छात्र संसदेला शाहीन अत्तरवाला या मुंबईहून आल्या होता. जंगली महाराज रस्त्यावरील मॅकडोनाल्डमध्ये त्या गेल्या होत्या. खाद्यपदार्थ घेऊन बाहेर पडत असतानाच त्यांना काँग्रेस भवन समोरील पदपथावर राहणाऱ्या आठ वर्षीय आकाश पवार या मुलाने खाण्यास मागितले. दया आल्याने शाहीन या मुलाला घेऊन पुन्हा आतमध्ये गेल्या. तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी या मुलाला बाहेर हुसकावले. त्याला खाऊ घेण्यासाठी काही पैसे देऊन रांगेमध्ये उभे केले. त्यानंतरही सुरक्षा रक्षकाने त्या मुलाला तेथून हाकलून लावले. शाहीन यांनी आकाशला खाऊ घेऊन दिला. परंतु या सर्व प्रकाराबद्दल त्यांनी ब्लॉगवर लिहिल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. त्यानंतर शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या एका दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत मॅकडॉनल्डवर चिखल आणि शेण फेकून निषेध व्यक्त केला. याप्रकारामुळे तणाव निर्माण झालेला पाहून दुकान बंद करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच बालगंधर्व चौकीचे उपनिरीक्षक उमाकांत पुणे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. (प्रतिनिधी)गणेशोत्सवामध्ये स्वच्छतेच्या कामासाठी मदत केल्यामुळे कष्टकऱ्यांच्या मुलांना घेऊन मॅकडोनाल्डमध्ये श्रीकृष्ण मंडळाने मेजवानी देण्याचा उपक्रम घेतला होता. मात्र या मळकट कळकट कपड्यांमधील मुलांना त्यावेळी अशाच पद्धतीने बाहेर काढण्यात आले होते.
पुण्यात ‘मॅकडॉनल्ड’वर चिखलफेक आंदोलन!
By admin | Updated: January 18, 2015 00:35 IST