भोसरी : उन्हाळा आला, की भारनियमनाचे चक्र सुरू आणि पावसाळा सुरू झाली की वारंवार वीजपुरवठा खंडित... ‘महावितरण’च्या अशा झटक्यांनी पिंपरीकर अक्षरश: हैराण झाले आहेत. हे कमी काय म्हणून गेल्या १५ ते २० दिवसांपासून पिंपरी परिसरात रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ वीज गायब होत आहे. याबाबत प्रशासनाने गांधारीची भूमिका घेतली असून, पिंपरीकरांच्या पाठीमागे वीजवितरण कंपनीने लावलेले हे विजेचे शुक्लकाष्ठ हटणार कधी, अशा संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होऊ लागल्या आहेत. पिंपरीच्या अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. विविध प्रकारच्या उत्पादनांची या ठिकाणी निर्मिती होत आहे. साहजिकच या ठिकाणी विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. महावितरणने प्रत्येक गुरुवारी वीजकपात करण्याचे धोरण अवंबल्यामुळे अनेक कंपन्या या दिवशी बंद असतात. मात्र त्या व्यतिरिक्त इतर दिवशीही अचानक वीज गायब होण्याचे प्रकार घडू लागले आहेत. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे उत्पादननिर्मितीवर विपरीत परिणाम होऊ लागला असल्याचे बोलले जात आहे. दिवसभरात कधीही वीजपुरवठा खंडित होत असून, पुन्हा अचानक वीजपुरवठा सुरू झाल्यामुळे घरगुती वीज उपकरणे जळण्याचे प्रकार घडू लागले आहेत. वीजवितरण कंपनीच्या अशा भोंगळ कारभारामुळे नागरिकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अघोषित भारनियमनाने आता मात्र पिंपरीकरांची चांगलीच झोप उडाली आहे. दररोज सकाळी, दुपारी, रात्री वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. गेल्या दहा दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे, मात्र महावितरण कंपनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)>वीजवाहिन्या भूमिगत, तरीही घोटाळा पिंपरी परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या सर्व वीजवाहिन्या भूमिगत आहेत. त्यामुळे वीजवाहिनी तुटून किंवा वीजखांबाचे नुकसान होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रश्नच येत नाही. शिवाय भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये पाणी जाऊन त्यात बिघाड व्हावा, एवढा पाऊसही नाही; मग तरीही वारंवार वीज गायब होण्याचे कारण काय, नेमका घोटाळा कुठे आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. पाट्या टाकण्याचे काम बंद करामहावितरणकडून आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी वीजकपात केली जाते. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील बहुतांश कंपन्यांना या दिवशी सुटी असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रोज सकाळ, दुपार, संध्याकाळी काही तास वीज गायब होत आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक असुविधांचा सामना करावा लागत आहे. महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही समस्या दिसत नाही का, असा संतप्त सवाल करून कर्मचारी केवळ पाट्या टाकण्याचे काम करत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
पिंपरीकरांना महावितरणचा धक्का
By admin | Updated: August 1, 2016 02:00 IST